कु. महानंदा पाटील यांना युगांनुसार पालटणारी मानवी मनाची अवस्था श्रीरामाने प्रत्यक्ष उदाहरणातून शिकवल्याची जाणीव होणे
१. महाप्रसादाच्या वेळी साधक ‘पार्सल’ घेऊन धावत जाणे, अन्य काही साधकही त्याच्या मागोमाग गेल्याने ‘काय झाले ?’, सर्वांना उत्सुकता वाटणे
‘३.११.२०१८ या दिवशी रात्री मी देवद आश्रमातील भोजनकक्षात महाप्रसाद घेत होते. त्या वेळी आश्रमातील एक साधक ‘पार्सल’ घेऊन स्वागतकक्षाच्या दिशेने धावत गेला. तेव्हा त्याच्या मागून काही साधकही गेले. सर्वांना ‘काय झाले आहे ?’, ही उत्सुकता होती. त्या वेळी माझ्या बाजूला बसलेली एक साधिका म्हणाली, ‘‘काही झाले नाही. जेवा !’’ त्या वेळी मला पुढील गोष्टीची आठवण झाली.
२. त्रेतायुगात एखादा शिष्य धावत गेल्यास इतर शिष्यांना ‘त्यांचे गुरु किंवा संत आले असावेत’, असे वाटून त्यांनी आनंदून त्या शिष्याच्या मागे धावत जाणे
त्या वेळी प्रथम मला त्रेतायुगाची आठवण झाली. ‘पूर्वीच्या काळी, म्हणजे सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपैकी त्रेतायुगामध्ये कसे होते ? एक जरी शिष्य धावत गेला, तर त्याच्या मागून इतर शिष्य धावत जायचे; कारण त्यांना वाटायचे, ‘एक शिष्य धावत गेला आहे, तर आपले गुरु, संत किंवा ऋषिमुनी आले असावेत.’ असे वाटून ते आनंदून जात असत.’
३. कलियुगामध्ये वातावरणात रज-तम पसरल्याने कुणी धावत गेल्यास इतरांना ‘काहीतरी वाईट घडले असावे’, असे वाटणे
सध्या आपण भयावह परिस्थितीतील कलियुगामध्ये आहोत. संपूर्ण वातावरणात रज-तम पसरलेले आहे. त्यामुळे माणसाच्या मनात येणारे विचार दुःखी असतात. कुणी धावत गेले, तर इतरांना वाटते, ‘काहीतरी वाईट घडलेे आहे. त्यामुळे त्याच्या मागे लोक धावत आहेत.’ त्यांच्या मनात नकारात्मकताच असते.
हे सर्व मला श्रीरामामुळे जाणवले. श्रीरामाने मला एकाच वेळी चारही युगांतील वातावरण दाखवून दिले. ‘युग आणि काळ यांनुसार माणसांचे विचार कसे असतात ? आणि माणसांची कृती कशी असते ?’, हे माझ्या लक्षात आणून दिले.’
– रामाची दासी, कु. महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.११.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |