श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ५)
१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
प्रकरण २ : चरित्रनायक श्रीपाद श्रीवल्लभ यांचे व्यक्तिमत्व – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470448.html |
प्रकरण ३ : चरित्रकालातील विविध राजसत्ता
पोथीमधील घटनांच्या संदर्भातील ऐतिहासिकता
सन १३०० ते १५०० पर्यंत भारतातील राजसत्तेच्याबाजूने काय काय परिस्थिती असावी याचा आढावा घ्यायचा प्रयत्न.
महंमद तुगलघ सत्ता
अल्लाउद्दिन खिलजीच्या तर्फे मलिक काफूरने सन १३१२ मधे मदुरा काबीज केली. महंमद बिन तुगलघ याच्या काळात १३२० ते १३५१ मदुरै पर्यंतचा भूभाग तुर्की सुलतानांच्याकडे आला होता १३५० मधे भीषण आग लागून मीनाक्षी मंदिर आणि शहराचे नुकसान झाले असावे. त्याआधीचे संपन्न व भरभराटीस आलेले मंदिर व आसपासचा गजबजलेला शहराचा भाग १३४० सुमारास शंकर भट्टांनी तेही अनुभले. (अ २.६ काळमागे करून असे दोन प्रकारचे अनुभव प्रसादरूपाने देण्याची श्रीपादांची आज्ञा होती.)
बहामनी सत्ता
ऊर्फ ब्राह्मणी राज्य (१३४७ – १५२६) – या घराण्यांत एकंदर १८ राजे झाले. त्यांतील पहिला सुलतान हसनगंगू उर्फ अल्लाउद्दीनशहा (१३४७ – १३५८). हा दिल्ली येथे गंगू नावाच्या ब्राह्मणाच्या पदरी गुलाम होता. या गंगु ब्राह्मणावर महंमद तुघ्लखाची मेहरबानी होती. (एका बखरीत मिरजेच्या गंगरसंपत देशपांडयाचा हसन हा चाकर होता असे म्हटले आहे) हसन हा अत्यंत इमानी असल्यामुळे, त्याच्या ब्राह्मण धन्याने महंमदापाशी त्याची तारीफ केली. सुलतानाने हसन यास सरदारकी देऊन दक्षिणेच्या सुभेदाराच्या मदतीस पाठविले, परंतु दक्षिणच्या सुभेदारानें हसनच्या साहाय्याने महंमदाविरुध्द बंड करून व दौलताबादचा किल्ला घेऊन नासिरुद्दीन नामक मनुष्याला दौलताबादचा सुलतान बनविले. महंमद तुघलखाने स्वतः दौलताबादेस वेढा दिला, पण उत्तरेकडे दुसरे बंड झाल्याने तो निघून गेला. याच वेळी हसन यास जफरखान असा किताब मिळाला. पुढे जाफरखानाने महमंद तुघ्लखाने पाठविलेल्या सैन्याचा वरंगळच्या राजाच्या मदतीने पराभव करुन बेदर व कंधार हे किल्ले काबीज केले. काही दिवसांनी नासिरुद्दीन याने आपले सुलतानपद स्वखुषीने जाफरखानास दिले (ऑगस्ट १३४७). जाफरखानाने अल्लाउद्दीन हसन असे नाव धारण करून आपल्या नावांची नाणी पाडिली व कलबुर्गा ही आपली राजधानी केली. तो हुषार व धोरणी होता. तो हिंदुधर्मद्वेष्टा नव्हता. तरी पण धर्माच्या बाबतीत कांही कपट करून त्याने दक्षिणेंतील हिंदु राजांना आपल्या पक्षास वळविले, देशमुख-देशपाडयांना इनामे दिली, अनेक मराठे, कानडी, नवीन तेलंगी जहागीरदार निर्माण केले. हसनचे राज्य हळू हळू विस्तृत झाले. आपल्या पूर्वीच्या धन्यास (गंगू ब्राह्मणास) न विसरता त्याने त्याला आपल्या दरबारी इतमामाने (फडवणीस म्हणून) ठेविले व त्याच्या स्मरणार्थ आपल्या नावास त्याने गंगू-ई-बहामनी असा किताब जोडिला. अल्लाउद्दीन हसनने मोठया न्यायाने राज्य केले. तो सन १३५८ मधे मरण पावला. त्यावेळी या विस्तार जवळ जवळ महाराष्ट्रभर झाला. या राज्याची प्रजा मुख्यतः हिंदु होती. हसन हा खुशामतीने व कपटाने मोठया पदास चढला. (सन १३५० च्या आधी या म्हणजे हसन गंगूू राजाच्या कारर्किर्दीत तो कृष्णानदीच्या काठी आपल्या लवाजम्यासह सहलीला आला असताना रविदासाला ते वैभव पाहून तसे ऐशोआरामाचे आयुष्य जगायची लालसा उत्पन्न झाली असावी, म्हणून श्रींनी त्याला याच राजघराण्यात जन्माचा पर्याय दिला असावा. – हा कंस माझा)
विजयानगर सत्ता
विजयानगर राज्य १३३६ त स्थापन झालें. सुमारें अडीचशें वर्षेपर्यंत मुसलमान लोक यावर स्वाऱ्या करीत होते, परंतु बराच कालपर्यंत यानें त्यांना दाद दिली नाहीं. विजयानगरचें राज्य कृष्णा नदी ओलांडून दक्षिण हिंदुस्थानभर होतें असें म्हणतां येईल. आज विजयानगर राजघराण्यांतील वंशज अनागोंदीस राहतात. त्यांनां थोडी फार जमीन असून इंग्रज सरकार कांहीं पेन्शन देतें. राजवाडा व त्याच्या भोंवतालचें आंगण हा या शहरचा मुख्य भाग गणला जातो. राजवाडयाच्या जवळ परंतु तुंगभद्रेच्या कांठीं नरसिंहाची पाषाणाची मूर्ति खोदलेली असून तिची उंची २२ फूट आहे. नदीच्या कांठीं पंपावतीचें दुसरें एक देऊळ आहे. हीं कामें बहुतेक कृष्णदेवरायाच्या अंमलांत झालेलीं आहेत. रामायणांत जी किष्किंधा नगरी वर्णिलेली आहे ती हंपीजवळच असावी. तेव्हां या स्थानाला क्षेत्राचेंहि महत्व प्राप्त झालें आहे.
हरिहर (१३३६-१३५६)आणि बुक्कराय (१३५६-१३७७) यांनी विजयानगरमची स्थापना केली. त्यांना प्रेरणा होती स्वामी विद्यारण्यांची. उन्मनी अवस्थेतील एका अवधूतांनी पीठापुरच्या जवळच्या एला नदीतून (सध्याचे नाव अर्ला) स्वयंभू दत्तमुर्ती शोधून अप्पळराज आणि सुमती यांच्या हस्ते पुन्हा स्थापित करायला लावली. ते अवधूत नंतर माधवाचार्य किंवा विद्यारण्य स्वामी झाले.
पांड्य राजसत्ता
जयवर्मन सुंदर (७१० ते १२५१) हा शूर असून, यानें नेल्लोर ते कन्याकुमारीपर्यंतचा सर्व पूर्व किनारा हस्तगत केला होता. पुढें (१३१०) मलिककाफर यानें जरी स्वारी केली तरी हें पाण्डय संस्थान सर्वस्वीं नष्ट झालें नाहीं साधारणपणें पाण्डय राज्याची मर्यादा उत्तरेस वेल्लार नदी, दक्षिणेस कन्याकुमारी, पूर्वेस कारोमांडल किनारा व पश्चिमेस त्रावणकोर संस्थानांतील अछहनकोवील (मोठी वेस) घाट अशी असे.
श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वतींच्या चरित्रकालापर्यंत (साधारण सन १३०० ते १५००) वरील तीन सत्ता भारतात राज्य करत होत्या. त्यानंतरच्या स्वामी समर्थांच्या (सन १८७८) चरित्रकालात इंग्रजी सत्ता स्थिरावली होती. पोथीतील वर्णित पुढील काळातील संत प्रभृती माणिकप्रभू (सन १८५६), साईबाबा (सन १९१८), गजानन महाराज (सन १९१०), गाडगे महाराज (सन १९५६), गोपाल बाबा (सन २११६) यांच्या काळापर्यंत भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळून संघराज्याची सत्ता झाली होती. तो ऐतिहासिक काल सर्वज्ञात आहे. “त्यामुळें प्राचीन पाण्डय राज्य समूळ नाश पावलें यापुढें ६० वर्षे मदुरेस मुसलमानांचा अंमल होता (१३११-७२). शेवटचा मुसलमान जहागीरदार फंदक मलिक यास विजयानगरचा सेनापति कंपन उडैयार यानें जिंकून मदुरा घेतली. नंतर या उडैयार घराण्यानें व निरनिराळ्या नायक राजांनीं येथें राज्य केलें. (१३७२-१६२३). मुसुलमानांनीं पाडून टाकलेलीं मदुरेचीं चार गोपुरें या नायकांनीं पुन्हां बांधिलीं. हे नायक विजयानगरचे मांडलिक असत. त्यांच्यांत प्रख्यात विश्वनाथ नायक झाला (१५५९). वरील (१३७२-१६२३) काळांत मदुरेच्या खालच्या भागांत एक पाण्डय घराणें जहागिरदाराप्रमाणें अस्तित्वांत होतें. ह्या पाण्डय राजांचीं नावें शिलालेखांतून आलेलीं आहेत. … पाण्डय हें नांव पाण्डवांचा बाप पण्डु याच्यापासून निघालें व पाण्डयन् हा त्याचा तामील अपभ्रंश आहे असें काल्डवेल वगैरे म्हणतात, बर्नेलचें मत, मूळ शब्द पाण्डयन् व पाण्डय हें त्याचें संस्कृतीकरण होय.” (कोशकारांच्या वेळची भाषा)
प्रकरण ४ : भौगौलिक रचना आणि दळणवळणांची साधने – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470463.html |