श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग २)
१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
भाग १ : लेखकाचे मनोगत – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470393.html |
प्रस्तावना
कल्पना करा – तुम्हाला एखाद्या मंदिरातील देवतेच्या समोर उभे राहिले असताना आदेश मिळाला की अमुक अमुक नावाच्या व्यक्तीला तू या या गावी जाऊन भेट. तर प्रथम जावे किंवा नाही असा संभ्रम निर्माण होईल. कारण मंदिरात जाताना त्यानंतर काय करायचे हे साधारण ठरवून ठेवलेले असते. तरीही असे समजा की तो आदेश शब्दशः मानून तुम्ही त्या एका अज्ञाताच्या शोधात निघालात कि ज्याचे आपणास फक्त नाव व गावाचे नाव कळले आहे, तर मंदिराच्या बाहेर आल्यावरच्या पहिल्या चौकातून कुठे वळणार? डावीकडे ? उजवीकडे कि समोर ? वाट कोणाला विचारणार? कोणत्या भाषेत? अशा समस्या वाटूनही ‘सरळ वाट फुटेल तिकडे’ म्हणून आपण अशी यात्रा पायी करायचा निश्चय करून निघालात… सध्या प्रमाणे बांधलेले रस्ते नाहीत, ढाबे, उपहारगृहे, राहायच्या सोई नाहीत, मार्गदर्शक पाट्या नाहीत…. तरी पण आपण ‘काही झाले तरी मी याचा शोध घेणारच’ या आपल्या निश्चयाच्या बळावर हा प्रवास चालू ठेवलात. त्यामुळे काही काही अंतरावर कोणीतरी आपणहून बोलावून किंवा हात दाखवून ज्या व्यक्तीला भेटायला निघाला आहेत त्यांचे नाव घेऊन, ‘जा, जरूर जा’ असे म्हणून खाण्यापिण्याची व्यवस्था करून पुढे पाठवतो. अशा वाटेत भेटणाऱ्या लोकांच्या प्रोत्साहनातून चरित्रनायकाची ओळख होत जात जात तुम्ही पुढे पुढे पायी चालला आहात…
या कल्पना चित्रातील कथनाप्रमाणे आपण अशा आदेशावर विश्वास ठेवून असा भरकटत जाणारा प्रवास, आधी काही कल्पना नसताना का व कसा करू नये अशी कारणे रचून ‘जाऊ नये’ असा सल्ला मनाला देऊन घरी परतला असतात… खरे आहे ना?
मात्र शंकर भट्ट भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारीच्या मंदिरातून असा खडतर निर्णय करून निघतात. तो त्यांचा उत्साह, निश्चय या पोथीच्या कथनातून अलौकिक, अध्यात्मिक आनंद देणारा जसा त्यांना होत होता तसाच तो आजही सहज अवलोकन करणाऱ्याला, पारायण म्हणून निश्चयाने वाचणाऱ्याला तितकाच आनंद देऊन जातो आणि हे श्रीपाद श्रीवल्लभ व्यक्तिमत्व आहे तरी काय? या उत्सुकतेने पुढे सरकते जाते.
धार्मिक उपदेशाची पोथी ही चरित्र नायकाच्या लीलांचे वर्णन करताना समोर आलेल्या पीडिताला दिलासा देऊन त्याचे दुःख हरण करणारे नुस्खे व उपाय सांगून ‘हा जप कर, तो अंगारा लाव’ असे सांगून ते आश्चर्यकारकपणे कसे शारीरिक व्यथेतून बरे किंवा समस्येतून सुटले याचे सुरस वर्णन करणारी असल्याने लोक त्या साहित्याकडे नाक मुरडून दुर्लक्ष करतात. पण ते ही जेंव्हा संकटात अडकतात तेंव्हा अशा दैवी उपायांच्या लीलांवर विसंबुन पोथी वाचनाकडे वळतात. असो.
प्रस्तूत लेखक या पोथीच्या अभ्यासाकडे वळायला श्रीपाद श्रीवल्लभांची प्रेरणा कारणीभूत आहे असे मानतो. का व कशी तें अन्यत्र लेखनातून समजून येईल. ही पोथी आहे तरी काय कि तिचा विविधांगानी चिकित्सक अभ्यास का केला पाहिजे. याबाबत थोडेसे…
बहुतेक धार्मिक पोथ्यांत त्या वेळच्या देशकाल परिस्थितीचे वर्णन फारच त्रोटक किंवा नगण्य असते. एक कारण असे असू शकते कि पीडिताला त्यावेळी ‘आसपास काय घडते आहे? देशात काय परिस्थिती आहे? कुठे काय चालले आहे?’ याकडे विचार करायला फुरसत नाही, मानसिक स्वास्थ्य नाही. सध्याच्या भाषेत बोलायचे तर चलनबंदीमुळे भारताची आर्थिक परिस्थिती सुधारली कि बिघडली? भारतीय संविधानातील ३७० व ३५ ए कलम रद्द केल्यावर पाकिस्तानाशी युद्ध करावे लागेल का? इमरानखान नंतर कोण गादी बळकावणार? उत्तर कोरियाच्या किंम युंगच्या बिंधास, धडाकेबाज वर्तनामुळे चीन आणि अमेरिकेचे संबंध दुरावणार कि सुधारणार? असा देश-कालाशी तात्कालिक निगडित प्रश्न गुरूंना विचारून आपल्या समस्येत काही भर तर पडणार नाही ना? असे वाटून असे टाळले जात असावेत. म्हणून आजकालचे जे चरित्रनायक आहेत त्यांच्या आगामी पोथीत जसे आजच्या काळातील अधार्मिक उल्लेख येणार नाहीत तसेच काहीसे त्या काळातील चरित्रनायकांच्याबाबत झाले असावे.
पोथीचे लेखक आणि चरित्रनायक यांची प्रत्यक्ष भेट झालेली असते असे सामान्यतः दिसत नाही. बहुतेक पोथीलेखक आपापल्या चरित्रनायकांचे मी प्रत्यक्ष दर्शन घेतलेले नाही, संकटातून सुटल्याचा अनुभवलेले नाही पण ऐकिव माहितीवर अवलंबून ह्या पोथीची रचना केली आहे असे न बोलून सुचवतात. काही मात्र संत दासगणूंसारखे शीघ्र कवी, जे वैयक्तिक जीवनात ब्रिटिशकाळी पोलिसदलात निस्पृह हवालदार म्हणून मान्यवर होते, पोथी लिखाणाची जबाबदारी घेताना लेखी पुराव्याशिवाय लेखनकार्य स्वीकारणार नाही असे म्हणतात. अशा पोथीतील घटनांकडे त्यामुळे जास्त विचारपुर्वक पाहिले जाते. उदा. ‘गजानन विजय’ पोथीच्या प्रस्तावनेत तसा उल्लेख आहे. असो.
असे असताना प्रस्तूत लेखकाला या पोथीतील लेखनाबद्दल एक विलक्षण आकर्षण निर्माण झाले. ते त्यातील काही वैशिष्ठांमुळे.
१. या पोथीचे लेखक शंकरभट्ट आणि चरित्र नायक यांनी एकमेकांची भेट घेतलेली आहे. साधारण सन १३४० ते १३५० काळात ते सानिध्यात होते.
२. पोथीची रचना प्रवास वर्णनात्मक आहे. त्यातून विविध मंदिरांची, गावांची, शहराची, नद्यांची ओळख होते.
त्या काळातील समाजाची परिस्थिती, चालीरिती, लोकांची राहणी, भाषा, बोली, धार्मिक रुढींचा पगडा, जातपातीची उतरंड, स्त्रिया-पुरुष परस्पर संबंध, अशा गोष्टींवर जाता जाता प्रकाश पडतो.
३. सन १३५० – १३५४ च्या आसपास पोथी लिहून पुर्ण झाल्यावर सन १९८७ पर्यंत ६३७ वर्षे ती गाडून ठेवण्याच्या आदेशामुळे एका विशिष्ठ घटनेच्या नंतर ती प्रकाशित व्हायचे केलेले भाकित, या ६३७ वर्षांच्या प्रदीर्घ अज्ञातवास कालावधीत पोथीतून त्यावेळी भविष्यकाळात होणाऱ्या घटनांची भाकिते नंतरच्या कालखंडात इतकी अचूकपणे घटित व्हावीत याचा पडताळा त्या व्यक्ती, त्या घटनांचे संदर्भ इतिहासात नमूद होऊन त्यांचे कर्तृत्व स्वतंत्रपणे तपासता येते. उदा. श्रींच्या आजोबांचे मित्र नरसिंह वर्मा हे यांच्या पुढील जन्मात शिवाजी महाराज म्हणून नावाला येतील असे कथन…
४. सध्या सन २०१८ मधे मूळ तेलुगुभाषेतील पोथीच्या मराठी अनुवादाच्या दोन पोथ्या उपलब्ध आहेत. त्यात पाठभेद आहेत. कमी जास्त मजकूर आहेत. कोण बरोबर कोण चूक असे न पाहता दोन्ही पोथ्यांचा समन्वयाने तौलनिक अभ्यासकरून पाठभेद असतील तर त्यांचा अन्वय लावायला मदत करणे असा उद्देश धरून विचार करणे.
५. श्रींच्या निजगमनाच्या आधीच्या १४ वर्षांच्या काळातील घटनांचा त्रोटक उल्लेख या पोथीतून येतो. त्या शिवाय आणखी सखोल माहिती करून देणारी एक वेगळी पोथी श्रीपादश्रीवल्लभ लीलाचरित्र सध्या उपलब्ध आहे. तिचा ही या अनुषंगाने विचार केला आहे.
६. जॉन नामक एक विदेशी व्यक्ती श्रींना भेटायला आला होता. त्यानंतर त्यांचे काय झाले? त्याने आदेशाप्रमाणे पोथीचे भाषांतर केले का? यानंतर आणखी काही लेखनकार्य प्रकाशात आले तर वेळोवेळी त्यावर ही विचार केला जाईल.
७. पोथीतील चर्चेतून निर्माण झालेल्या वक्तव्याची आजच्या वैज्ञानिक जगातील संकल्पनाशी कशी सांगड बसते, या वरून ह्या पोथीला धार्मिक आवरणापेक्षा आणखी काही पदर असल्याचे लक्षात येते.
८. नाडी ग्रंथ भविष्यातील कथनांचे संदर्भ काही अध्यायात येतात. यावर सविस्तर माहिती आणि सध्या ते कुठे आणि कसे उपलब्ध आहेत यावर प्रकाश टाकायची गरज आहे.
९. श्रींच्या आजोळच्या ३३व्या पिढीतील व्यक्ती म्हणून मल्लादि गोविंद दीक्षितुलु हे व्यक्तिमत्व समोर येते, ज्यांच्यामुळे आजकाल ही पोथी आपण वाचतो, पारायण करतो, त्यांच्या बाबत संकलित केलेली माहिती.
१०. पोथीतील कथने किती व्यक्तींच्या शिड्यांवरून चढून आपणापर्यंत पोहोचली आहेत. याची कल्पना केली तर थक्क व्हायला होते.
११. आत्मसाक्षात्कार कसा होतो? मोक्ष म्हणजे काय? दत्त ही संकल्पना काय? ग्रहताऱ्यांचा मानवाशी संबंध असतो का? गुरु शिष्य संकल्पना काय असते? वगैरे पटकन उत्तर न देता येत अशा वरील भाष्य सोप्या शब्दातून खूप सांगुन जाते.
१२. मराठीमधे गोपाळबाबा प्रत, निटुरकर प्रत, रामस्वामी प्रत, अशा पोथ्या डिसेंबर २०१९ पर्यंत वाचनात आल्या. त्यात काही ठिकाणी पाठ भेद आढळून येतात. तर काही भाग पुर्णपणे गाळलेला दिसतो. तसे का व्हावे याची कारणे शोधता येत नाहीत कारण ज्या पोथ्यांना समोर ठेऊन भाषांतर केले गेले असावे त्यात काही फरक असल्याने भाषांतरकारांकडून तशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. या प्रबंधाच्या वाचकांपैकी ज्यांनी तेलुगूतील मूळ प्रत वाचलेली असेल तर त्यात काय सादर केले आहे याचा विचार करुन चिकित्सा करावी लागेल. तौलनिक अभ्यास केला गेला तो ही याठिकाणी सादर केला आहे.
प्रकरण १ : शंकर भट्ट आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचे व्यक्तिमत्व – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470408.html |