श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग १)
१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
माझे मनोगत
संत साहित्य, विशेषतः औलिया संत चरित्राच्या पोथ्यांचा देवघरात ठेऊन रोज किंवा परिपाठाने, सप्ताह किंवा पारायण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या लेखनातील अदभूतता इतरांना आलेले अनुभव आणि श्रद्धा भाव याच्या प्रभावाने पोथी साहित्याकडे ‘खाजगीत श्रद्धेने उपयोगात आणायची बाब’ असे संबोधून चिकित्सकपणे कमी पाहिले जाते. पारायणासाठी किंवा रोजच्या नित्यनियमातून वाचनाला ठराविक जागेचे, वेळेचे, सोवळे, भोजनादि बंधन येते. वाचताना थांबून न कळलेल्या शब्दांचे अर्थ, संकल्पना, आपल्यावर अशी वेळ आली तर प्रसंगी कसे वागायचे, यावर विचार करायला बंधन येते. पोथीतील कथनाबाबत प्रश्न पडले तरी विचारायची सोय नसते. विविध कारणांनी वाचन तसेच पुढे चालू राहते. असो.
हवाईदलातील सन १९८१ ते १९८६ कालातील माझ्या सेवेत नवी दिल्लीमधील वेस्टर्न एयर कमांड मुख्यालयात पोस्टींगमधे असताना विवाहितांना सिव्हिलियन भागात घर करून राहायला परवानगी असे. मला जनकपुरीत घर मिळाले. तिथे सी २-२२० बंगल्यात राहात असताना १९८५ साली ‘जर प्रचिती येईल तर वाचन करेन’ असे थोडेसे आव्हानात्मक बोलून मी वाचायला सुरवात केली. आणि खरोखरच तशी प्रचिती वाचनाच्या तिसऱ्या दिवशी पासून मिळत राहिली. त्या मधून ‘अंधार छाया’ नावाने मराठी कादंबरीचे लेखन आपोआप चालू झाले. एकदा कोर्ट कचेरीच्या दुष्ट किटाळातून ‘बाइज्जत’ सुटका झाली. नंतरच्या काळात नाडी ग्रंथभविष्य या त्यावेळपर्यंत भारतीयांना काहीशा अज्ञात विषयातून अनेकांना मार्गदर्शक होईल असे समाजकार्य घडले. याशिवाय वैयक्तिक जीवन समृद्ध व्हायला अनेकदा मानसिक आधार आणि बळ मिळाले. दर दत्त जयंतीला गुरुचरित्र वाचनाची गोडी वाढली. हवाईदलातील सेवेत रात्रीच्या शांत वेळी मला पारायण करायला हुरूप येत असे. श्रीनगर सारख्या संवेदनशील आणीबाणीच्या कालावधीत माझ्या पारायणाच्या दिवसात रात्रीच्या ड्युटीज् लागूनही योग्य वेळ आणि संधी मिळून खंड पडला नाही. अनेकदा कठीण प्रसंगातून लीलया मात करून काही ना काही अदभूत अनुभवांची शिदोरी दरवर्षी वाढत गेली.
गुरूचरित्र वाचनानंतर त्यात उल्लेख केलेल्या स्थळांना भेट देण्याच्या माझ्या परिपाठामुळे आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळच्या पीठापुरच्या क्षेत्रयात्रेत श्रींच्या अधिक जवळ गेल्या सारखे झाले. एक दिवस अचानक श्रींची एक आकर्षक मूर्ती माझ्या घरी आपसूक आली आणि या अभ्यास कार्याला वेळोवळी चालना मिळत गेली.
लेखकाचे निवेदन
दरवर्षीच्या गुरुचरित्राच्या पारायणानंतर या पोथीचा विविधांगाने कसा अभ्यास करता येईल यावर विचार करत असताना हातात श्रीपाद श्रीवल्लभ मराठीमधील पोथी हातात आली. गुरुचरित्र पोथीच्या बरोबर त्या पोथीचे पारायण मी केले. त्याचा अद्भुत अनुभव घेतला. पुढे आपोआप तिचेच वाचन मी चालू ठेवले. मध्यंतरीच्या काळात पीठापूरला जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा संत कै.गोपाळ बाबा यांच्या प्रकाशनातर्फे आणखी एका श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्र या पोथीचा परिचय झाला. त्यामुळे ह भ प निटूरकरांनी अनुवाद केलेल्या आणि गोपाळ बाबांची अशा दोन पोथ्यांमधून वाचनाचा आनंद वाढला. काही काळापुर्वी सहजासहजी कै. विठ्ठलबाबांच्या दृष्टांतावर आधारित माहितीतून श्रींच्या पीठापूर नंतर पुढील १४ वर्षातील प्रवासातून घटनांचा पट कसा उलगडतो हे कळून आले. त्यांचे संदर्भ महत्वाचे वाटून ते ही या अभ्यासात समाविष्ट केले आहेत. २०१६ च्या दत्तजयंती नंतर गेला काही काळ विविध अंगांनी या पोथीचा अभ्यास करण्याची प्रेरणा झाली आणि या प्रबंध निर्मितीस सुरवात झाली. वेळोवेळी यात भर घातली जाईल. अशी भर एका नव्याने प्रकाशित झालेल्या पीठापुरमच्या पुज्य कै. रामस्वामींच्या प्रेरणेने मराठीत प्रकाशित झालेल्या पोथीमुळे होत आहे. आधी हिन्दीत भाषांतरित केलेल्या या पोथीला मराठीत रुपांतरित करायला इंदोरच्या सौ. शुभदा मराठे यांना पुज्य रामस्वामींनी आज्ञा केली. त्यानंतर सौ. स्वाती देशपांडे भाटकरांच्या प्रेमळ साथीने ते क्लिष्ट आणि जबाबदारीचे कार्य पुर्ण होऊन सोमवार, ३० ऑक्टोबर २०१७ साली वाचकांच्या हाती आले. शिवाय अन्य विचारकांनी यात आपला हातभार लावावा अशी विनंती करतो. माझ्या लेखनातील त्रुटीं जरूर सादर कराव्यात. मी म्हणतो तसेच पायी प्रवास सातशे वर्षांपुर्वी घडले असा माझा दावा नाही. अधिक माहितीपुर्ण नकाशे, पायवाटा, रंजक माहिती संकलित करायला इच्छुकांनी पुढाकार घ्यावा अशी माझी भूमिका आहे.
हे पुस्तक किंवा ईबुक पारायण करताना किंवा आधी किंवा नंतर, ‘स्थाली पुलक’ न्यायाने म्हणजे संपूर्ण जेवण लहानशा ताटलीत देतात तसे, त्या त्या दिवसाच्या अध्यायात काय म्हटले आहे? काही संकल्पना, गावे, मंदिरे, ऐतिहासिक व्यक्ती, अन्य माहिती फोटो यावरून सातशे वर्षांपूर्वीच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक रचनेची थोडक्यात कल्पना यावी असा विचार करून सादर केले आहे. यामध्ये आणखी भर घालून वाचकांची सोय करावी ही विनंती.
भाग २ : प्रस्तावना – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470400.html |