आधुनिक वैद्य आणि परिचारिका आता पूर्णपणे थकलेले आहेत ! – डॉ. संजय ओक, प्रमुख, कोविड फोर्स
भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी जनतेने आतातरी ईश्वराची भक्ती करावी. ईश्वरच तुम्हाला यातून तारेल ! |
मुंबई – गेल्या वर्षभरापासून राज्यातील आधुनिक वैद्य आणि परिचारिका अविरतपणे काम करत आहेत. आता आरोग्य यंत्रणेतील हे सर्व कर्मचारी पूर्णपणे थकलेले आहेत. नेहमीच्या रुग्णांवर उपचार करा, कोरोनाच्या रुग्णांकडे बघा आणि लसीकरणही करा, असे तिहेरी दायित्व ते आता पेलू शकत नाहीत, असे विधान ‘कोविड टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना केले.
डॉ.ओक पुढे म्हणाले,
१. राज्यातील नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला नाही, तर महाराष्ट्रात दीर्घकाळ दळणवळण बंदीची कार्यवाही करावी लागेल. इंग्लंडमध्ये जानेवारी २०२१ च्या प्रारंभी दुसरी लाट आल्यानंतर देशव्यापी दळणवळण बंदी घोषित करण्यात आली होती. मला लोकांना घाबरावायचे नाही; मात्र इंग्लंडमधील दळणवळण बंदी ही ९२ दिवस लांबली होती. महाराष्ट्रावर तशी परिस्थिती येऊ नये; म्हणून कोरोनाचा संसर्ग वेळीच आटोक्यात आणला पाहिजे.
२. दळणवळण बंदी, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त या त्रिसूत्रीच्या जोरावरच कोरोनाची दुसरी लाट परतवता येऊ शकते. नागरिकांनी कोरोनाच्या निर्बंधांचे काटेकोर पालन केले आणि वेगाने लसीकरण केले, तर आपण लवकर यामधून बाहेर पडू.
३. एप्रिल मासातील शेवटचे तीन दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या तीन दिवसांतील रुग्णसंख्येवर दळणवळण बंदी आणखी किती काळ लांबेल, हे निश्चित होईल.
४. लसीकरण वेगाने झाले पाहिजे. जून मासाच्या शेवटपर्यंत भारतामधील बहुसंख्य लोकसंख्येला लस मिळाली, तर या वर्षाच्या शेवटापर्यंत भारत कोरोनामुक्त होऊ शकतो; मात्र त्यासाठी वेगाने लसीकरण व्हायला हवे. एक दिवस लसीचा साठा मिळाला आणि दुसर्या दिवशीही तो मिळालाच नाही, असे होता कामा नये.
५. लसीकरणाच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांना सहभागी करून घ्यायला हवे. हे स्वयंसेवक लसीकरण केंद्रांवर लॉजिस्टिक्सचे संपूर्ण दायित्व सांभाळतील. आम्ही त्यांना काही दिवसांचे प्रशिक्षण देऊ. लस देण्याचे काम मात्र आरोग्य कर्मचारी पार पाडतील.