६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील यांना श्रीराम आणि हनुमंत यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
१. श्रीरामाचे चित्र असलेला ‘राममंदिर विशेषांक’ जवळ घेऊन रात्री झोपल्यावर ‘राम, राम’, असा नामजप चालू असल्याचे सकाळी लक्षात येणे आणि रामाच्या चित्रावर हात ठेवल्यावर नामजप चालू राहून शरिराची जाणीव न होणे
‘२८.४.२०२० या दिवशी रात्री झोपतांना मी श्रीरामाचे चित्र असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘राममंदिर विशेषांक’ उजव्या बाजूला ठेवला. दुसर्या दिवशी सकाळी मला जाग आल्यावर माझा ‘राम, राम’ असा नामजप संथ गतीने चालू असल्याचे लक्षात आले. त्या वेळी मी ‘राममंदिर विशेषांका’तील रामाच्या चित्राकडे एकटक पहात होते. त्या वेळी मला दिसले, ‘रामाच्या डोळ्यांमधून अश्रू येत आहेत.’ तेव्हा राम मला सूक्ष्मातून म्हणाला, ‘किती भावपूर्णरित्या नामजप करतेस ? माझाही भाव जागृत झाला.’ त्यानंतर मी रामाच्या चित्रावर हात ठेवला. तेव्हा माझा नामजप चालूच होता आणि माझे डोळे मिटले होते. तेव्हा मला माझ्या शरिराची जाणीव होत नव्हती; पण माझा नामजप गतीने होत होता.
२. सकाळी ‘श्रीरामाच्या चित्रावर हात ठेवावा’, असा विचार येणे, तेव्हा ‘अस्वच्छ हात चित्रावर कसे ठेवायचे ?’, असे वाटून ‘बोटांवर रामनाम दिसून त्यांवरील आवरण गेले’, असे जाणवणे
१.५.२०२० या दिवशी रात्री मी ‘राममंदिर विशेषांक’ घेऊन झोपले होते. मला सकाळी ६ वाजता जाग आली. माझ्या मनात आले, ‘रामाच्या चित्रावर हात ठेवूया; पण ‘माझे हात अस्वच्छ आहेत, तर ते रामाच्या चित्रावर कसे ठेवू ?’’, असे वाटून मी रामाला म्हणाले, ‘रामा, माझे हात अस्वच्छ आहेत.’ मी असे म्हणताक्षणी मला माझ्या दोन्ही हातांच्या बोटांच्या पेरांवर ‘राम, राम’, असे दिसले. त्यामुळे ‘माझे हात स्वच्छ झाले. त्यांवर आलेले आवरण निघून गेले’, असे मला जाणवले.
३. साधिकेच्या मनात गीत रामायणातील गीत चालू झाल्यावर तिला ‘हाताच्या अंगठ्यावर हनुमंत येऊन तो श्रीरामाच्या आज्ञेची आतुरतेने वाट पहात आहे’, असे जाणवणे
त्यानंतर माझ्या मनात ‘स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे…।’ हे गीत रामायणातील गीत चालू झाले. तेव्हा मला दिसले, ‘हनुमंत माझ्या दोन्ही हातांच्या अंगठ्यांवर येऊन बसला आहे. हनुमंताची शेपटी खाली लोंबकळत आहे. त्या वेळी हनुमंत ‘राम त्याला कधी आणि काय सेवा सांगतो ?’, याची वाट पहात होता. त्याला केवळ रामाच्या सेवेचा ध्यास होता आणि तो सेवेसाठी तत्पर होता. माझ्या एवढ्याशा अंगठ्यावर एवढा मोठा हनुमंत बसला होता आणि मी त्याला पाहू शकत होते. हनुमंत आनंदी होता.’ हे सर्व मी पहात आणि अनुभवत असतांना माझे डोळे मिटलेले होते. नंतर १० मिनिटांनी उठून मी रामाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हाही माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर हनुमंत बसलेला होता.’ (३.५.२०२०)
– कु. महानंदा पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|