कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील ३० बंदीवान कोरोनाबाधित !
ठाणे, २० एप्रिल (वार्ता.) – कल्याण येथील आधारवाडी कारागृहात ३० बंदीवानांना कोरोनाची लागण झाली आहे. कारागृहात सध्या १ सहस्र ९२२ बंदीवान आहेत. कोरोनाबाधितांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १८ एप्रिल या दिवशी आधारवाडी कारागृहातील ३५० बंदीवानांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांपैकी ३० बंदीवानांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. कारागृहातील ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणार्या बंदीवानांचे कोविडचे लसीकरण चालू करण्यात आले आहे. रुग्ण सापडल्यानंतर कारागृहात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून उर्वरित सर्व बंदीवानांना पोषक आहार देण्यात येत आहे. बंदीवानांसाठी तेथे विलगीकरण कक्षही सिद्ध करण्यात आला आहे. तसेच येथील डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नवीन बंदीवानांना तेथे ठेवले जात आहे.