मुंबई येथे ‘पॉईंटमन’ मयूर शेळके यांनी भरधाव एक्सप्रेस समोरून येत असतांनाही रूळावर पडलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवले !

मुंबई – येथील वांगणी रेल्वेस्थानकावर भरधाव वेगाने एक्सप्रेस येत असतांना ‘पॉईंटमन’ मयूर शेळके यांनी स्वत:चे प्राण संकटात घालून रेल्वे रूळावर पडलेल्या ६ वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले. हा व्हिडिओ सामाजिक प्रसामाध्यमांवरून प्रसारित झाल्यावर मयूर शेळके यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. स्वत: केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूर यांना संपर्क करून त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले.

१. १७ एप्रिल या दिवशी वांगणी रेल्वेस्थानकाच्या फलाटावरून संगीता शिरसाठ या त्यांच्या छोट्या मुलाचा हात धरून जात होत्या. शिरसाठ या अंध आहेत. फलाटावरून जात असतांना तोल जाऊन त्यांचा मुलगा फलाटावरून थेट रेल्वेच्या रूळावर पडला. त्याच वेळी पुढून उद्यान एक्सप्रेस भरधाव वेगाने रेल्वेस्थानकाकडे येत होती. त्या वेळी मयूर शेळके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत होते.

२. छोटा मुलगा रूळावर पडल्याचे पाहून मयूर यांनी थेट रूळावर उडी घेत धावत जाऊन पडलेल्या मुलाला रूळावरून उचलून फलाटावर ठेवले. काही क्षणाचाही विलंब झाला असता, तर मयूर शेळके हेही स्वत: रेल्वेखाली येण्याची भीती होती.

३. हा सर्व प्रसंग रेल्वेस्थानकावरील ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यात चित्रीत झाला. एकुलत्या एक मुलाला वाचवल्याविषयी संगीता शिरसाठ यांनी मयूर शेळके यांचे आभार मानले.

मयूर शेळके यांच्या या धाडसाविषयी रेल्वे प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करतांना मयूर म्हणाले, ‘‘मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतांना काही क्षण भीती वाटली. आपल्याही जिवाला धोका आहे, हे लक्षात आले; मात्र मुलाचा जीव वाचवण्यासाठी हे धाडस करणे आवश्यक होते आणि त्यात मला यश आले. मुलाचा जीव वाचवता आला, याचा मला आनंद आहे.’’