देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार !
मुंबई – पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव टाकणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे या कारणांवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलेपार्ले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पक्षाचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता विजय माने यांनी ही तक्रार केली आहे. याविषयी त्यांनी गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
‘ब्रुक फार्मा’ या आस्थापनाच्या संचालकांना पोलिसांनी कह्यात घेतल्यावर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी वाद घातला होता. यावरून अधिवक्ता विजय माने यांनी ही तक्रार केली आहे. याविषयी ‘ब्रुक फार्मा’ आस्थापन ‘रेमडेसिविर’ औषधाचा काळाबाजार करत असल्याच्या संशयावरून त्यांच्या संचालकांना अन्वेषणासाठी कह्यात घेण्यात आले होते, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. भाजपने मात्र या प्रकरणात राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे.