आर्तभावाने अन् शरणागतभावाने नामजप म्हटला, तरच भावजागृती होते आणि असा नामजप ऐकणार्‍याचीही भावजागृती होते !

कु. तेजल पात्रीकर

​‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाकडून काळानुसार देवतांच्या नामजपांचे ध्वनीमुद्रण (रेकॉर्डींग) चालू केले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘आपण समाजासाठी असे नामजप सिद्ध करूया की, ‘ते ऐकूनच ऐकणार्‍याची भावजागृती होईल. या नामजपांमुळे समाजातील लोकांनाही सहजतेने भाव अनुभवता येईल.’’ मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘नामजप भावपूर्ण कसा म्हणायचा ?’, हे शिकण्याची संधी मिळाली. या वेळी श्रीरामाच्या तारक नामजप निर्मितीच्या प्रक्रियेत मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीच्या भूमीपूजनाच्या वेळी ‘श्रीरामाचा भावपूर्ण नामजप सगळ्यांना उपलब्ध व्हावा’, यासाठी तो आधी सिद्ध करायला प्राधान्य देणे

​‘५.८.२०२० या दिवशी अयोध्या येथे रामजन्मभूमीचे भूमीपूजन होणार होते. त्यानिमित्त ‘त्या दिवशी सर्वांनी अधिकाधिक श्रीरामाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा’, असे सांगितले होते. या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मी सप्तदेवतांचे तारक नामजप करत होते. त्यातील श्रीरामाचा नामजप एका टप्प्यापर्यंत सिद्ध झाला होता. रामजन्मभूमीपूजनाचे औचित्य साधून हा नामजप प्रथम अंतिम करण्यासाठी घेतला.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीरामाचा अंतिम केलेला नामजप केवळ ३ दिवस आधी ‘त्यात भाव जाणवत नाही’, असे सांगून पुन्हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यास सांगणे

२.८.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीरामाचा नामजप ऐकून अंतिम केला आणि म्हणाले, ‘‘हा नामजप संकेतस्थळावर ठेवूया.’’ त्यानुसार मी पुढील सर्व प्रक्रिया करत असतांना दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी मला कळवले, ‘त्या नामजपात भाव जाणवत नाही. आज पुन्हा दिवसभर नामजपाचा सराव करून नवीन नामजप ध्वनीमुद्रित करूया.’
त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर मला या प्रसंगातून ‘वर्तमानकाळात राहून परिस्थिती स्वीकारायला आणि समाजाला देतांना प्रत्येक गोष्ट परिपूर्णच द्यायला हवी, हे शिकवत होते’, असे जाणवले.

३. नामजपाचे पुन्हा ध्वनीमुद्रण करायला जाण्यापूर्वी मनाची स्थिती नकारात्मक होणे, सद्गुरु गाडगीळकाकांना नामजप भावपूर्ण होण्यासाठी उपाय विचारायला जाणे, तेव्हा त्यांनी ‘श्रीराम आज तुझा नामजप अंतिम करून घेईल’, असा आशीर्वाद देणे

या प्रसंगानंतर आरंभी माझ्या मनात ‘मला भावपूर्ण नामजप म्हणायला जमणार नाही. माझ्यात भाव नाही, तर तो नामजपात कसा येईल ?’, असे नकारात्मक विचार आले. त्या वेळी माझी श्रद्धा न्यून पडली. परात्पर गुरु डॉक्टरांंचे आज्ञापालन करण्यासाठी मी पुन्हा श्रीरामाचा नामजप ध्वनीमुद्रित करायला गेले. तेथे जाण्याआधी मी सद्गुरु गाडगीळकाकांना भेटून ‘श्रीरामाच्या नामजपात भाव कसा आणू ? त्यासाठी काही आध्यात्मिक उपाय करायचे का ?’, असे विचारण्यासाठी गेले. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाका मला म्हणाले, ‘‘आज सकाळीच महत् भाग्यामुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. तू आज नामजपाचे ध्वीमुद्रण कर. आज श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अयोध्येत श्रीरामाने दर्शन दिले, तर तो आज तुझा नामजपही भावपूर्ण करून घेईल.’’ असे म्हणून त्यांनी मला अग्नीहोत्राची विभूती दिली. तेव्हा ‘भावपूर्ण नामजप होण्यासाठी जणू त्यांनी मला आशीर्वादच दिला’, असे मला जाणवले.

४. नामजपाचे ध्वनीमुद्रण करतांना आवाज हलत असल्याने निराशा येणे, नामजपात आर्तभाव येण्यासाठी आजी म्हणत असलेले श्रीरामाचे भजन म्हणतांना पुष्कळ भावजागृती होणे आणि आर्त भावस्थितीत ध्वनीमुद्रित केलेला नामजप ऐकतांना चांगले वाटणे

पुन्हा ध्वनीमुद्रण करण्यासाठी नामजप म्हणण्यास आरंभ केल्यावर माझा आवाज हलत (स्थिर लागत नव्हता.) होता. त्यामुळे पुन्हा माझ्या मनात ‘मला हे जमणार नाही’, असे नकारात्मक विचार यायला लागले. शेवटी मी माझी आजी नेहमी ‘ही रामनाम नौका भवसागरी तराया ।’ हे श्रीरामाचे भजन म्हणायची, ते भजन आर्ततेने म्हटले. त्यातील शेवटचे कडवे

‘आम्ही सर्व ही प्रवासी ।
जाणार दूर देशी ।
तो मार्ग दाखवाया ।
अधिकारी रामराया ।’

हे म्हणतांनाच माझी भावजागृती झाली आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सकाळीच मला पाठवलेले अयोध्येच्या श्रीरामाचे चित्र डोळ्यांसमोर येऊन मला त्याचे चरण दिसू लागले. मी त्यालाच आतून ‘हे श्रीरामा, मला काही येत नाही रे. तुझ्या चरणांशी हा नामजप समर्पित होऊ दे’, अशी आर्ततेने प्रार्थना करत होते. त्या आर्त भावस्थितीत मी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित केला. तो म्हणतांनाही माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते. त्यानंतर ‘ध्वनीमुद्रित झालेले नामजप ऐकूया’, असे वाटून मी ते ऐकले. तेव्हा त्यातील एक नामजप ऐकतांना मला पुष्कळ चांगले वाटले.

५. भावस्थितीत ध्वनीमुद्रित केलेला नामजप ऐकल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘हा नामजप भावपूर्ण झाल्याने तो ऐकत रहावा, असे वाटते’, असे सांगणे

​मी निवडलेला तो नामजप परात्पर गुरु डॉक्टरांना ऐकवल्यावर ते म्हणाले, ‘‘भाव जागृत होत आहेे ना ? हा नामजप एकदा ऐकल्यावरच भावजागृती होते.’’ पहिल्यांदाच असे झाले असेल की, एका दिवसात नामजप ध्वनीमुद्रित केला आणि तो अंतिम झाला.’’ खरेतर हे केवळ त्यांच्या संकल्पानेच घडले होते. याआधी ‘मी नामजप म्हणायचे आणि त्यांना त्याचे ध्वनीमुद्रण ऐकवायचे. तेव्हा त्यात ते सुधारणा सांगायचे. त्या सुधारणा करून मी पुन्हा त्यांना म्हणून दाखवायचे.’

६. ‘आज श्रीरामानेच तुझ्याकडून नामजप करवून घेतला’, असे म्हणून श्रीरामाला कर्तेपणा देणारे श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले !

हा नामजप ऐकल्यावर त्यांनी मला विचारले, ‘‘आज वेगळे काय केलेस ? एवढ्या लवकर नामजप भावपूर्ण कसा झाला ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘श्रीराम आमचे कुलदैवत आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मला पाठवलेले अयोध्येच्या श्रीरामाचे चित्र डोळ्यांसमोर ठेवून मी नामजप केला आणि मनातून आपला धावा केला.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘बघ, श्रीरामानेच तुझ्याकडून नामजप करवून घेतला. ते तुमचे कुलदैवत आहे ना ? मग त्यानेच करवून घेतला.’’ प्रत्यक्षात परात्पर गुरुदेवांनीच तो करवून घेतला.

७. शिकायला मिळालेली सूत्रे

७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नामजप भावपूर्ण होण्यासाठी टप्प्याटप्याने शिकवणे : आताचा हा भावपूर्ण नामजप ऐकल्यावर ‘आरंभीला मी म्हणून दाखवलेले नामजप एकदम बाळबोध आहेत’, असे माझ्या लक्षात आले; परंतु तरीही परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यात सुधारणा सांगत ‘आधी उच्चार परिपूर्ण (व्यवस्थित) कसे म्हणायचे ?’, हे मला शिकवले. मला उच्चार (व्यवस्थित म्हणायला) परिपूर्ण जमायला लागल्यावर त्यांनी ‘त्यात भाव कसा आणायचा ?’, ते शिकवले. ते प्रत्येक टप्प्याला मला शिकवत होते. थेट भावपूर्ण नामजप न होता, तो तसा करण्यासाठी ‘कोणत्या टप्प्यातून जावे लागते ? आणि शरणागती अन् आर्तता वाढत गेल्यावर त्यात भाव येतो’, हे त्यांनी मला या प्रसंगातून शिकवले.

७ आ. नामजप भावपूर्ण असेल, तर त्याचा आवाज मोठा असला, तरी त्यातील गोडव्यामुळे तो कर्कश न वाटणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला नामजप लावलेल्या ध्वनीक्षेपकाचा (स्पीकरचा) आवाज वाढवायला सांगितला. नामजप मोठ्या आवाजात लावला, तरी तो कर्कश वाटत नव्हता. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘भावपूर्ण झालेला नामजप कितीही मोठ्या आवाजात लावला, तरी त्यातील भावामुळे त्या नामजपात गोडवा येतो. त्यामुळे आवाज वाढवला, तरी तो कर्कश वाटत नाही. याउलट भाव नसलेल्या नामजपाचा आवाज वाढवला, तर तो कर्कश वाटतो.’’

८. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टर नेहमी मला म्हणायचे, ‘नामजप म्हणतांना तुझी भावजागृती होईल, तेव्हा ऐकणार्‍याचीही होईल.’ आज ते प्रत्यक्ष त्यांनी माझ्याकडून करवून घेतले. केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प अन् सद्गुरु गाडगीळकाकांचा आशीर्वाद यांमुळेच हा नामजप भावपूर्ण होऊ शकला. या नामजपाने मला शरणागती शिकवली. हा नामजप परात्पर गुरु डॉक्टरांना ऐकवतांनाही माझे भावाश्रू वहात होते. त्या क्षणी मला वाटले, ‘हा नामजप प्रत्यक्ष श्रीरामाच्या चरणी पोचला !’ 

– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (७.४.२०२१)

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार देवतांच्या तारक आणि मारक नामजपांची केलेली निर्मिती !

प्रभु श्रीरामाची हिंदी भाषेतील आरती आणि कर्पूर आरतीही उपलब्ध

​‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कुठल्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले. त्यातून हे नामजप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे हे नामजप केल्यावर त्यातून काळानुसार आवश्यक असे त्या त्या देवतेचे तारक किंवा मारक तत्त्व प्रत्येकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळण्यास साहाय्य होईल.

हे नामजप, तसेच प्रभु श्रीरामाची हिंदी भाषेतील आरती आणि कर्पूर आरतीही संकेतस्थळ आणि ‘चैतन्य अ‍ॅप’ (सनातन चैतन्यवाणी) या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण यांचा अवश्य लाभ घ्यावा. या नामजपांविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

हे नामजप पुढील लिंकवर उपलब्ध आहेत
https://www.sanatan.org/mr/a/519.html

‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅप डाऊनलोड करून आरती आणि नामजप ऐका :  https://www.sanatan.org/Chaitanyavani

हे नामजप ऐकतांना आपणांस काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास आम्हाला अवश्य कळवा. आमचा पत्ता आहे, contact@sanatan.org

– कु. तेजल पात्रीकर