निर्बंध लावल्याने किती लाभ होतो, याचा सरकारने विचार करावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
नागपूर – राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक आव्हानात्मक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. निर्बंध लावत असतांना सध्या जे निर्बंध कार्यवाहीत आहेत, त्यांचा कितपत लाभ होत आहे, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. सरकारला वाटत असेल, तर नक्कीच निर्बंधांमध्ये वाढ केली पाहिजे, असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २० एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, १९ एप्रिल या दिवशी रेमडेसिविर इंजेक्शनविषयी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत जे निर्देश दिले, त्याविषयी आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप शक्य होणार आहे. शहरात मागील २ दिवसांमध्ये एक दिवस फक्त ५००, तर दुसर्या दिवशी एकही रेमडेसिविर इंजेक्शन सरकारकडून देण्यात आले नाही. त्या तुलनेत काही प्रभावशाली मंत्र्यांनी मुंबई आणि परिसरात अधिक इंजेक्शने नेली होती. तेही आमचेच लोक आहेत. तेथेही इंजेक्शने दिली पाहिजेत; मात्र सरकार म्हणून ज्या ठिकाणी अधिक रुग्ण आहेत, तिथे अधिक पुरवठा करून न्यायउचित धोरण राबवणे आवश्यक आहे. आता केंद्र सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादनाविषयी अनुमती वाढवून उत्पादन जवळपास दुपटीपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे लवकरच इंजेक्शनच्या पुरवठ्याची समस्या दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.