स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान देण्याचा हिंदु युवक-युवतींचा निश्‍चय !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

मुंबई, २० एप्रिल (वार्ता.) – जेव्हा हिंदूंमधील शौर्य जागृत झाले, तेव्हा त्यांनी पाच पातशाह्यांना पायदळी तुडवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. धर्माचरण करून आणि स्वरक्षण प्रशिक्षण शिकून हे शौर्य हिंदूंनी पुन्हा जागृत करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हेमंत पुजारे यांनी केले. मुंबईतील युवक-युवतींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. पुजारे बोलत होते. या व्याख्यानात सहभागी युवक-युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान देण्याचा निश्‍चय केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्‍विनी सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. दैनंदिन जीवनात होणार्‍या आक्रमणांपासून स्वत:चे रक्षण कसे करावे ? याची प्रात्यक्षिके या वेळी ‘ऑनलाईन’ माध्यमातून दाखवण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होणार असल्याचेही या वेळी उपस्थित युवक-युवतींनी सांगितले.