सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे
शिकण्याच्या स्थितीत रहाणे – साधनेला अत्यंत पोषक घटक !
१. शिकण्याची स्थिती
‘सत्संग, बैठक, प्रसार, संपर्क अथवा एखादी सेवा केल्यानंतर ‘मला काय शिकायला मिळाले ?’, असा विचार माझ्या मनात लगेच येतो का ?’, असा विचार मनात येणे, म्हणजेच शिकण्याच्या स्थितीत रहाणे होय. हे साधनेला अत्यंत पोषक आहे.
अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अनंत काळ शिकत राहिले, तरी शिकणे पूर्ण होऊ शकत नाही. भगवंत साधकांना अनेक माध्यमांतून अखंड शिकवत असतो. असे आहे, तर ‘मी दिवसभरात किती गोष्टी शिकतो ?’, याचा अभ्यास करावा.
२. दिवसभरात ‘मी शिकण्याच्या स्थितीत किती असतो आणि शिकवण्याच्या स्थितीत किती असतो’, याचा अभ्यास करावा !
परम दयाळू, परम कृपाळू भगवंत ‘केवळ मला शिकता यावे’, यासाठी माझ्या जीवनात अनेक प्रसंग घडवत असतो. ‘भगवंताची ही कृपा माझ्या लक्षात येते का ?’, ‘या प्रसंगातून मी शिकण्याचा प्रयत्न करतो का ?’, याचा अभ्यास करावा.
३. शिकणारा आणि शिकवणारा
‘साधनेत ज्याला ‘मी अज्ञानी आहे’, असे वाटते; तो सतत शिकण्याच्या स्थितीत रहातो. ज्याला ‘मला अधिक कळते’, असे वाटते, तो सतत इतरांना शिकवत रहातो आणि शिकण्यातील आनंदापासून वंचित रहातो.
शिकवणार्यापेक्षा शिकणारा साधनेत लवकर पुढे जातो.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)