ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे कोरोना रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू !
चंद्रपूर – ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद रुग्णालयात असलेल्या प्रवासी निवार्यात उपचाराविनाच एका कोरोनाबाधिताचा तडफडून मृत्यू झाला. मृतक नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आंबोरा येथील असून तेथील आधुनिक वैद्यांनी त्याला ब्रह्मपुरी येथे पाठवले होते. मृत व्यक्तीची पत्नी त्यास खासगी वाहनाने ब्रह्मपुरी येथे घेऊन आली; मात्र ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी खाट उपलब्ध नव्हत्या. ऑक्सिजन नसल्याने या व्यक्तीवर उपचार होऊ शकले नाहीत. इतरत्र धावपळ करूनही उपचार होऊ शकले नाहीत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा हा मतदारसंघ आहे.
हताश झालेली मृत व्यक्तीची पत्नी त्यासह ब्रह्मपुरी ख्रिस्तानंद चौकातील प्रवासी निवार्यात येत होती. अशातच तिच्या पतीचा उपचाराविना मृत्यू झाला. सर्व यंत्रणांना पाचारण करून अंत्यविधी करण्यात आला. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत ब्रह्मपुरी तालुक्याची हीच स्थिती होती; मात्र दुसर्या लाटेतही आरोग्य यंत्रणा सक्षम होऊ शकली नाही. आज नागरिकांना खाट मिळेनाशा झाल्या आहेत. ऑक्सिजनची सुविधा अनेक ठिकाणी नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
दूरदर्शनवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्या ! – विजय सिद्धावार, जिल्हा उपाध्यक्ष, आप
ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित निघत असतांनाही स्थानिक नगर प्रशासन आणि पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून कोणतीही सुधारणा होतांना दिसत नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी केला. मागील एका आठवड्यात ५२९ कोरोनाबाधित निघाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे; मात्र या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री विजय वडेट्टीवार याकडे लक्ष न देता मुंबईच्या लोकल रेल्वेविषयी दूरदर्शनवर चर्चा करतांना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.