कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही ! – आचार्य महामंडलेश्वर श्री रामकृष्णानंद महाराज
हरिद्वार, १९ एप्रिल (वार्ता.) – कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही. हिंदूंच्या कुंभमेळ्याला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) प्रसारमाध्यमे आणि साम्यवादी विरोध करत आहेत, हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन श्री पंच अग्नि आखाड्याचे महामंत्री आचार्य महामंडलेश्वर श्री रामकृष्णानंद महाराज यांनी केले. येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आचार्य महामंडलेश्वर श्री रामकृष्णानंद महाराज यांची समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री पंच अग्नि आखाड्याचे अध्यक्ष महामंडलेश्वर श्री सोमेश्वरानंद हेही उपस्थित होते.
आचार्य महामंडलेश्वर श्री रामकृष्णानंद महाराज पुढे म्हणाले की, ख्रिस्त्यांकडून हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. याचसमवेत ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून आई-बहीण यांना फसवून त्यांची शिकार केली जात आहे. याला पंच अग्नि आखाडा विरोध करते. आम्ही साधू केवळ माळा जपत नाही, तर आमच्या हातात शस्त्रही आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. आज षड्यंत्र रचून हिंदूंना जाती जातींमध्ये विभागले जात आहे. आपण सर्व हिंदू आहोत, अशी भावना हिंदूंमध्ये निर्माण व्हायला हवी. केवळ ‘हिंदुस्थानात रहाणारा हिंदु’ असे न म्हणता त्याच्याकडे व्यापक दृष्टीने पहाणे आवश्यक आहे. या वेळी श्री. घनवट यांनी श्री पंच अग्नि आखाड्याचे अध्यक्ष महामंडलेश्वर श्री सोमेश्वरानंद आणि आचार्य महामंडलेश्वर श्री रामकृष्णानंद महाराज यांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले.