थकवा असतांना मानसरित्या देवद आश्रमात गेल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज यांची भेट होणे आणि त्यांनी सांगितलेले उपाय केल्यामुळे अंगात शक्ती जाणवणे
‘ऑगस्ट मासात मला ८ – १० दिवस शारीरिक त्रासामुळे पुष्कळ थकवा जाणवत होता. १५.८.२०२० या दिवशी सकाळी नामजप झाल्यानंतर मी मानसरित्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेले. तेव्हा आश्रमातील बाहेरील बाजूस मला ४ – ५ मोर दिसले. त्यांपैकी १ मोर मोठा आणि ४ मोर लहान होते. ते आनंदाने पिसारा फुलवून इकडे-तिकडे नाचत होते. मी त्यांच्याजवळ गेले. तेव्हा मोठ्या मोराने चोचीने माझ्या साडीचा पदर धरला आणि तो मला आश्रमाकडे घेऊन जाऊ लागला. त्याने मला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीच्या (परात्पर गुरु पांडे महाराज देहत्यागापूर्वी वास्तव्यास असलेल्या खोलीच्या) दारापर्यंत नेले. नंतर तो मोर निघून गेला. मी खोलीचे दार उघडून पाहिले. तेव्हा समोरच्या बिछान्यावर परात्पर गुरु पांडे महाराज बसले होते. त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज आणि माझ्यात पुढील संभाषण झाले.
परात्पर गुरु पांडे महाराज : आलीस ? ये बस.
मी : हो बाबा.
परात्पर गुरु पांडे महाराज : काय ? निर्गुण उपाय करायचे ?
मी (माझ्या मनात उपायांचे विचार नव्हते, तरी) : हो.
‘मी उपाय करायला हवेत’, हे माझ्या लक्षात आले नव्हते. नंतर महाराजांनी माझ्यापुढे गणपतीची लहान मूर्ती धरली. ती मी पाहिली; पण मला काही कळले नाही. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज मला म्हणाले, ‘तुझा तळहात तुझ्या स्वाधिष्ठानचक्रावर ठेव आणि ‘श्री महागणपतये नमः ।’ हा जप १०८ वेळा कर.’
मी महाराजांनी सांगितलेला नामजप तिथेच बसून केला. माझा नामजप पूर्ण झाला; पण मला महाराज दिसले नाहीत. मी पुन्हा माझ्या घरीच असल्याची मला जाणीव झाली. त्यानंतर मला शक्ती जाणवू लागली. परात्पर गुरुमाऊली या अनुभूतीसाठी तुमच्या आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती अंजली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |