गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘कीर्तनविश्व’या नावाच्या ‘यू ट्यूब’ चॅनलचा प्रारंभ !
पुढील १२ वर्षे चालणार उपक्रम
कोल्हापूर – जगभरातील तमाम मराठी बांधवांसाठी ‘विश्व मराठी परिषद’ आणि ‘भीष्म इंडिक फाऊंडेशन’ यांच्या वतीने ‘कीर्तनविश्व’ नावाचे ‘यू ट्यूब’ चॅनलचा ( https://www.youtube.com/channel/UCFmC2bR29P0_rRyS18e_sPQ) प्रारंभ करण्यात आला आहे. या ‘चॅनेल’वर प्रत्येक आठवड्याला ३ दर्जेदार कीर्तन सादर होणार असून पुढील १२ वर्षे हा उपक्रम चालणार आहे. प्राध्यापक क्षितिज पाटुकले प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या सहयोगाने हा उपक्रम चालवण्यात येत आहे.
या संदर्भात ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे म्हणाले, ‘‘कोरोनामुळे संपूर्ण जगात निराशा पसरली आहे. या कीर्तनांच्या श्रवणामुळे ही निराशा पळून जाईल, आत्मविश्वास परत मिळेल, बौद्धिक आनंद मिळेल. यात देशभरातील नामांकित कीर्तनकार सहभागी असून ही कीर्तन पुन: पुन्हा ऐकावी अशी आहेत. याचसमवेत संस्कृती आणि परंपरा यांसमवेत एक निखळ नाते सिद्ध होईल. कीर्तन हे व्यक्तीचे जीवन खर्या अर्थाने उन्नत करण्याचे एक फार प्रभावी साधन आहे. आपला श्रेष्ठ राष्ट्रीय वारसा आणि तत्त्वज्ञानही या माध्यमातून सर्वांना समजावून घेता येईल.’’
या ‘यू ट्यूब चॅनेल’वर ‘नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, रामदासी कीर्तन, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, दासगणू महाराज, दत्त संप्रदायाची कीर्तन, असे नानाविध कीर्तनप्रकार ऐकायला मिळणार आहेत. कीर्तनकारांची मुलाखत हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण आहे. |