देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा का ? याची माहिती घेत आहोत ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील

मुंबई – रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्यानेच पोलिसांनी ‘ब्रुक फार्मा’ आस्थापनाच्या मालकांना अन्वेषणासाठी बोलावले होते. पोलिसांवर दबाव टाकणे, हा शासकीय कामकाजात हस्तक्षेप समजला जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा का ? याचे अन्वेषण करण्यात येत आहे, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी केले.

रेमडेसिविर औषधाचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी ‘ब्रुक फार्मा’ या आस्थापनाच्या मालकांना कह्यात घेतल्याच्या कारणावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मध्यरात्री विलेपार्ले पोलीस ठाणे आणि बीकेसी येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात जाऊन पोलिसांशी वाद घातला. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरील माहिती दिली.

स्वत:ची नाचक्की होईल, म्हणून ‘ब्रुक फार्मा’वर कारवाई ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मुंबई – मी ‘ब्रुक फार्मा’ आस्थापनाला भेट दिली, त्या वेळी तेथून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना संपर्क केला होता. ‘ब्रुक फार्मा’ या आस्थापनामध्ये रेमडेसिविरचा साठा आढळला असल्यास पोलिसांनी तो सार्वजनिक करावा. अन्वेषण करायला कुणी अडवले आहे. काळाबाजार होत असेल, तर कारवाई करा. शासनाचा बोगसपणा उघड झाला आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही पोलीस ठाण्यात गेलो, तर सत्ताधार्‍यांच्या पोटात का दुखते ? आम्ही रेमडेसिविर उपलब्ध करून दिल्यास शासनाची नाचक्की होईल; म्हणून ही कारवाई करण्यात आली, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी १९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.