अंतर्गत युद्ध केव्हा जिंकणार ?
भारत आणि पाकिस्तान किंवा भारत अन् चीन यांच्यात युद्ध होण्याच्या शक्यतेपूर्वीच देशात मोठे गृहयुद्ध चालू झालेले आहे. केंद्रातील भाजप सरकारने म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी याची तात्काळ नोंद घेत तशी घोषणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. देशात कोरोना विषाणूमुळे प्रतिदिन सवा दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहेत, तर शेकडोंच्या संख्येने कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. यात प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने वाढ होत आहे. पहिल्या कोरोना लाटेच्या वेळी पाश्चात्त्य देशांनी जी भीती व्यक्त केली होती, ती प्रत्यक्षात आता दिसू लागली आहे. कोरोना झाला म्हणून मृत पावणारे आणि तो झाल्यानंतर योग्य औषधोपचाराची सुविधा न मिळाल्याने मृत्यू पावणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मृत्यूनंतरही त्यांच्या शवांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमींमध्ये रांगा लागल्या आहेत. भारतात आजही मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्यांची संख्या अल्प नसल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी रांगा लावलेल्या मृतांच्या नातेवाइकांची लूट करण्याचे प्रकारही समोर येत आहेत. अशा काळात पुन्हा एकदा संपूर्ण दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू करण्याची आवश्यकता आहे, हे आता पंतप्रधान मोदी यांना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. कोरोनावरून भाजपशासित राज्ये आणि भाजपेतर राज्ये यांच्यातील चालू असलेले आरोप-प्रत्यारोप केवळ मोदी थांबवू शकतात, हे अनेक भारतियांना वाटत आहे. भाजपेतर राज्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झालेले असले, तरी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड या भाजपशासित राज्यांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. भाजपेतर राज्यांत जसा ऑक्सिजनचा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा आणि रुग्णालयात खाटांचा तुटवडा आहे, तीच स्थिती भाजपशासित राज्यांतही कमी-अधिक प्रमाणात आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी जनतेने मोदी यांना प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात नियमांचे पालन केले. याला तबलिगी जमात आणि रमझानचा काळ अपवाद राहिला होता, हे कुणी नाकारू शकत नाही. नंतरच्या वर्षभरात कोरोनाबाधितांची संख्या न्यून होणे आणि लसी निर्माण होऊन लसीकरण चालू झाल्याने जनतेमध्ये शिथिलता आली अन् त्याचा परिणाम आज दिसू लागला आहे. या काळात उलट सरकारने अधिक कठोर रहाण्याची आवश्यकता होती. लसीकरण चालू असले, तरी नियमांचे उल्लंघन करता येणार नाही, हे स्पष्ट बजावणे आवश्यक होते; कारण कोरोना पूर्णपणे नामशेष झाला नव्हता. तज्ञांकडून, तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट येऊ शकते अन् ती पूर्वीपेक्षा अधिक भयानक असू शकते, हे सांगितले जात होते. याकडे सरकार आणि जनता दोघांनीही दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज दोघांना भोगावे लागत आहेत.
भारतियांच्या बेशिस्तीचा परिणाम !
भारतियांमध्ये मुळात शिस्तीचा अभाव असल्याने जनता आणि राजकारणी हे त्या संदर्भात सारखेच असल्याने एकूणच गोंधळाची स्थिती आहे. एकीकडे सरकार म्हणते ‘नियमांचे पालन करा’, तर दुसरीकडे देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका घेतल्या जात आहेत आणि त्याच्या प्रचाराच्या वेळी लाखोंच्या संख्येने लोक गोळा होत आहे. हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना दिसत असूनही ते डोळे बंद करून वागत आहेत, हे लज्जास्पद आहे. देशाची स्थिती बिघडली असली, तरी अद्याप बंगालमधील मतदानाचे तीन टप्पे शेष आहेत. बंगालमध्ये ५०० टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव ओसरत चालल्यावर अनेक गोष्टींना सुट दिली गेली. मग ते चित्रपटगृह असतील, निवडणुका असतील, चित्रपटांचे चित्रीकरण असेल, हे आता भारी पडले आहे. विवाह समारंभाला ५० जणांची मर्यादा असली, तरी अनेक ठिकाणी आणि त्यातही राजकारण्यांच्या विवाहांना सहस्रोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने दुसरे तरी नियमांचे का पालन करतील ? अशी स्थिती निर्माण झाली. आता या सर्व चुकांचा अभ्यास करून पंतप्रधान मोदी यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. पुन्हा लॉकडाऊन केल्यास रोजंदारीवर काम करणारे, तसेच भारताची एकूण अर्थव्यवस्था कशी स्थिर राहील, याचा अभ्यास अधिक महत्त्वाचा असणार आहे. कोरोनाशी लढणे हे अंतर्गत युद्ध असल्याने दोन देशांतील युद्धांत जशी आर्थिक हानी होते, तशी येथेही होणारच आहे, नव्हे होत आहे, हे लक्षात घेऊन तसे नियोजन करावे लागेल.
कोरोना काळ कधी संपेल, हे आताच सांगता येणार नाही. अद्यापही भारतात लसीकरणाला तितकासा वेग आलेला नाही. इतकेच नव्हे, लसींचा तुटवडा जाणवत आहे. लस उत्पादनासाठी कच्चा माल मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे, हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. सीमेवरील सैनिक शत्रू देशाच्या सैनिकांना ठार करण्यासाठी प्राणपणाने लढत असतो; पण कोरोनारूपी शत्रू सूक्ष्मरूपाने प्राण घेण्यासाठी टपलेला असतांना नागरिक अत्यंत दायित्वशून्यता दाखवत आहेत, हे भारतियांना लज्जास्पद आहे. भारतीय स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घेऊ शकत नसतील, तर असे नागरिक देशात असणे काय उपयोगाचे ? असा विचार कुणी व्यक्त केला, तर तो चुकीचा कसा असू शकेल ? कोरोनासाठी ‘ब्रेक दि चेन’ असे म्हटले जात आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला घरात बंद करावे लागणार आहे. त्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा लागेल. पहिल्या दळणवळण बंदीप्रमाणे लोकांना घरपोच धान्य पुरवण्याची आणि जेवण पोचवण्याची व्यवस्था करावी लागेल.
देवाचे साहाय्य घ्या !
कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना होत आहे. त्यात जे विविध रोगांनी ग्रस्त आहेत, अशा अनेकांचा मृत्य झाल्याचेही समोर येत आहे, म्हणजेच कोरोनापासून संपूर्ण संरक्षण निर्माण झालेले नाही. अशा वेळी कोरोनाशी लढण्यासाठी सूक्ष्मस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे साधना केली पाहिजे. हिंदु धर्मांत असे अनेक यज्ञ, होमहवन आणि मंत्र आहेत, ज्यांमुळे सूक्ष्म विषाणूंचा नाश होतो. त्याचे आयोजन करण्यासह पालन केले पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ‘मठ-मंदिरे यांना अग्निहोत्र करण्याचे आदेश देऊ’, असे म्हटले आहे. त्यासमवेत जनतेला साधना करण्यास, तसेच संतांचे मार्गदर्शन घेऊन विशिष्ट मंत्रजप करण्यासही सांगितले पाहिजे, तर आणि तरच हे युद्ध भारत जिंकू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे !