धर्मविरोधी विचारांना पायबंद घालत रुई (जिल्हा सातारा) येथे पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा !
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम !
सातारा – कोरेगाव तालुक्यातील रुई या गावी गत २ वर्षांपासून अनेकजण गुढीपाडव्याला गुढीऐवजी ध्वज उभा करत होते; मात्र हिंदु जनजागृती समितीने गावातील धर्माभिमानी हिंदूंचे प्रबोधन केले आणि त्यांना गुढी उभारण्याचे आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. त्यामुळे रुई गावातील अनेकांनी ध्वजाऐवजी गुढ्या उभारून पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला, तसेच एकमेकांना हिंदु नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
कोरेगाव तालुक्यातील रुई आणि चंचळी या गावांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात. संचारबंदी आणि दळणवळण बंदी यांच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिज्ञासूंच्या माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनांचा लाभ रुई आणि चंचळी गावातील जिज्ञासूंनी घेतला. या प्रवचनामध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व सांगितल्यावर तेथील महिलांनी ‘आम्ही गुढीऐवजी ध्वज उभारत होतो; मात्र आता आम्ही गुढी उभारू’, असे सांगितले. तसेच ग्रामस्थांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी गुढीपाडव्याविषयी प्रबोधन करणार्या दृकश्राव्य माध्यमातील साहित्याची मागणीही केली. गावातील जिज्ञासूंचा उत्साह पाहून समितीसेवकांनी गुढीपाडव्याआधी गावातील काही जिज्ञासूंच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रबोधन केले. याचा परिणाम म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी कुटुंबे वगळता गावातील अनेक कुटुंबांनी ध्वजाऐवजी गुढी उभारून ‘आध्यात्मिक स्तरावर गुढीपाडवा’ साजरा केला.