मुंबईहून आलेल्या प्रवाशाचे कुडाळ रेल्वेस्थानकात निधन झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे उघड
सावंतवाडी – कोकणरेल्वेच्या दादर-सावंतवाडी गाडीने प्रवास करणार्या कुडाळ येथील एका प्रवाशाचे कुडाळ रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १७ एप्रिलला सकाळी ही घटना घडली. मृत्यूनंतर प्रवाशाची आरोग्य खात्याकडून कोरोनाविषयीची चाचणी केली असता ती कोरोना सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यामुळे आरोग्य प्रशासनासह रेल्वे प्रशासनही गडबडले.
हा प्रवासी दादर-सावंतवाडी गाडीतून आलेला असतांनाही त्याआधी आलेल्या ‘हॉलिडे स्पेशल’ गाडीतील प्रवाशांनाही घरी अलगीकरणात रहाण्याचा समादेश देण्यात आला. त्या प्रवाशांचीही कोरोनाविषयीची तपासणी करणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.
अनावश्यक फिरणार्यांची रॅपिड टेस्ट : ५ जण कोरोनाबाधित असल्याचे उघड
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अनावश्यक फिरणार्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस १९ एप्रिलपासून कडक भूमिका घेणार आहेत, तसेच अनावश्यक फिरणार्यांची ‘रॅपिड टेस्ट’ करून जे कोरोनाबाधित आढळतील त्यांना थेट कोरोना केंद्रात भरती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर
१८ एप्रिलला दोडामार्ग बाजारपेठेत १, कणकवलीत २ आणि कुडाळ शहरात २ जण, असा ५ जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला.
सिंधुदुर्गात कोरोनाचे ३४१ नवीन रुग्ण : ६ जणांचा मृत्यू
मृत्यू झालेले एकूण रुग्ण २१६
उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र ४०९
बरे झालेले एकूण रुग्ण ७ सहस्र २७६
आतापर्यंतचे एकूण रुग्ण ९ सहस्र ९०७
चिंताजनक प्रकृती असलेले रुग्ण ८८