कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका आठवड्यात ९ सहस्र ५०० जणांवर गुन्हे प्रविष्ट

 पणजी, १८ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाविषयक राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गोवा पोलिसांनी गेल्या एका आठवड्यात ९ सहस्र ५०० गुन्हे प्रविष्ट केले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ‘फेस मास्क’ न घातल्याने ९ सहस्र ४३८ गुन्हे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावरून १०९ गुन्हे, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे, तंबाखूजन्य पदार्थ खाणे आदींच्या विरोधात ११३ गुन्हे नोंद झाले आहेत. याद्वारे ८ ते १४ एप्रिल या काळात दंडस्वरूपात १९ लाख २५ सहस्र १०० रुपये वसूल करण्यात आले. याविषयी दक्षिण गोव्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे पंकज कुमार सिंह म्हणाले, ‘‘पोलीस सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे आदींविषयी समाजात जागृतीही करत आहेत, त्याचप्रमाणे दंडही आकारत आहेत.’’