रुग्णांना साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्ययंत्रणेची धडपड !
कोरोनाच्या दुसर्या लाटेने गोव्यात हाहा:कार !
पणजी, १८ एप्रिल (वार्ता.) – राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने राज्यशासनाची आरोग्ययंत्रणा या अनुषंगाने पायाभूत साधनसुविधा, तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी धडपड करत आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतांना एक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा ती हाताळण्यासाठी शासन सज्ज नव्हते, त्याप्रमाणे आता कोरोनाची दुसरी लाट आलेली असतांनाही शासनाची हीच स्थिती झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षाही घातक आहे. गेल्या २० दिवसांहून अधिक काळ शासकीय रुग्णालयांतील ९ खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू विभाग) रुग्णांनी भरलेला आहे, तर यावरील ताण अल्प करण्यासाठी १४ एप्रिल या दिवशी कार्यरत करण्यात आलेला ९ खाटांचा ‘आयटीयु’ विभागही पूर्णक्षमतेने कार्यरत आहे. १० दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील ‘कोविड’ विभागातील १० रुग्णांना ‘ट्रॉली’वर झोपवून उपचार द्यावे लागले होते. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील खाटांची क्षमता ३०० खाटांनी वाढवणार असल्याचे शासनाने म्हटलेले असले, तरी १७ एप्रिलपर्यंत याची पूर्तता झालेली नाही. अजूनही अतिरिक्त आरोग्य कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यांचे डॉक्टर यांच्यावर ताण आला आहे. रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वैद्यकीय अधिकारी नेमण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.’’
सद्यःस्थितीविषयी अन्य एक वैद्यकीय अधिकारी म्हणाले, ‘‘आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी आपण सिद्ध नाही. गतवर्षीप्रमाणे (कोरोनाची पहिली लाट आलेली असतांना) आताही रुग्णालयातील प्रभाग तुडुंब भरले आहेत आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कर्मचार्यांवर ताण आला आहे.’’
एका खासगी रुग्णालयाचे एक वरिष्ठ डॉक्टर म्हणाले, ‘‘जी खासगी रुग्णालये २ ठिकाणी सुविधा देऊ शकतात, त्यांच्या एके ठिकाणच्या सुविधेचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करण्यात येऊ शकते. या रुग्णालयांकडे मनुष्यबळ आणि साधनसुविधा उपलब्ध आहे; मात्र शासनाने अजूनही असा निर्णय न घेणे हे आश्चर्यकारक आहे. आता आलेली ही कोरोनाची ‘लाट’ नव्हे, तर ती ‘त्सुनामी’ आहे.’’
स्थिती गतवर्षीच्या तुलनेत निराळी असून चिंता करण्याची आवश्यकता नाही ! – आरोग्यमंत्री राणे
शासनाच्या स्थितीविषयी बोलतांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत आता दुसर्या वेळी आरोग्य सेवेवर ताण आलेला असला, तरी आरोग्य कर्मचार्यांची योग्य प्रमाणात नेमणूक करण्यात येत आहे. यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही. रेमडेसिवीर आणि ‘ऑक्सीजन’ यांचा तुटवडा होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. या वेळी स्थिती गतवर्षीच्या तुलनेत निराळी आहे. गोमंतकियांचे प्राण वाचवण्यासाठी साधनसुविधांचा कसा वापर करता येईल, हे पहावे लागेल आणि यासाठी तज्ञांचा सहभाग असलेल्या एका समितीची १९ एप्रिल या दिवशी एक बैठक घेतली जाणार आहे.’’
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस्.एम्. बांदेकर म्हणाले, ‘‘दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ४०० खाटा आहेत. हे रुग्णालय लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यात येणार आहे.’’