बेळगावच्या प्रश्नावर ६९ हुतात्मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
बेळगाव – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिल्यांदा ३ मासांचा कारागृहवास बेळगावच्या प्रश्नावरच झाला होता. बेळगावच्या प्रश्नावर ६९ हुतात्मे देणारा शिवसेना हा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आहे; पण आता रक्त सांडणार नाही. भगव्या झेंड्याला हात लावाल, तर याद राखा, अशी चेतावणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारसभेत बोलत होते. संजय राऊत यांनी बेळगावमध्ये प्रचार फेरीही काढली.
संजय राऊत पुढे म्हणाले, ‘‘बेळगावमध्ये दडपशाही चालू आहे हे पंतप्रधानांनी बेळगाव येथे येऊन पहावे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येलूरला लावू दिला जात नाही. जेसीबी लावून पुतळा काढला. हे सर्व गंभीर आहे.’’
सीमाभागात लवकरच सीमा समन्वय मंत्र्यांचे संपर्क कार्यालय ! – संजय राऊत
बेळगाव – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत सीमाभागात होणार्या हस्तक्षेपाची नोंद घेण्यासाठी आणि सीमावासियांना दिलासा देण्यासाठी बेळगावात सीमा समन्वय मंत्र्यांचे संपर्क कार्यालय चालू करण्याविषयी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
भाजप मराठी भाषिकांसमवेत नाही ! – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
बेळगाव – मागील ५ वर्षे भाजप महाराष्ट्रात सत्तेत होती, त्या वेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांसाठी दुर्लक्ष केले. आता एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसमवेत नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारास पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा घोषित केला. त्या वेळी ते बोलत होते.