देवस्थान समितीच्या नूतन अध्यक्षांकडून अपेक्षा !
महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने ८ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती विसर्जित केली. या समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची धडाडीची कारकीर्द आणि निर्णय घेण्याची क्षमता पहाता श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड आणि काशी कुंड खुले करणे, देवस्थानच्या अनेक गायब असलेल्या जमिनी शोधणे यांसह अनेक प्रकरणांत लक्ष घालून ती धसास लावावीत, तसेच मंदिरातील परंपरा अबाधित रहाव्यात, अशा अनेक भक्तांच्या अपेक्षा आहेत.
हिंदु विधीज्ञ परिषद आणि श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती यांनी सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत असलेल्या ३ सहस्र ६७ मंदिरांमधील भ्रष्टाचार, अनियमितता, मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमण यांसह अनेक गोष्टी उजेडात आणल्या. वर्ष २०१५ पासून मोर्चा, आंदोलने, निवेदन देणे, विधानसभेत प्रश्न उपस्थित करणे, तक्रार करणे अशा विविध मार्गांनी लढा चालू आहे. यामुळेच वर्षभरापूर्वी श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ झाला. मध्यंतरी कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे याच्या कामाची गती मंदावली; पण गेल्या ४ मासांपासून या कामास गती आली. सध्या कुंडाच्या एका बाजूला असलेल्या माऊली लॉजच्या अतिक्रमणामुळे हे काम थांबले; परंतु नुकतेच लॉजच्या मालकांनी अतिक्रमण काढण्यास अनुमती दिली असून ते काम लवकर होण्यासाठी जिल्हाधिकार्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.
देवस्थान समितीच्या कारभाराविषयी निर्णय घेण्याविषयी जिल्हाधिकार्यांना आता आडकाठी आणणारे कुणी नसून अध्यक्ष या नात्याने ते सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे ते कोणताही हितावह निर्णय तात्काळ घेऊ शकतात. काही मासांपूर्वी शासकीय रुग्णालयात आग लागल्यावर जिल्हाधिकारी गाडीचालकाची वाट न पहाता सायकलवरून तेथे गेले, तर दुर्गम अशा डोंगरभागात रहात असलेल्या लोकांची स्थिती जाणण्यासाठी ते चालत गेले होते. याच धडाडीची अपेक्षा कोल्हापूरकर आणि भक्त मंदिराविषयी करत आहेत.
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर