चीनच्या चहाड्या !
गलवान खोर्यात चीनने केलेल्या आगळीकीला भारतीय सैन्याने यशस्वी प्रत्युत्तर दिल्यानंतर चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या. या बैठकांच्या वेळी भारताने त्याची बाजू ठामपणे मांडली आणि चीनने नमते घेत सीमेवरील सैन्य मागे घेण्याची सिद्धता चालू केल्याच्या बातम्या वाचनात आल्या. चीनसारखा वरपांगी अत्यंत क्रूर आणि कपटी शत्रू चक्क सीमेवर आणलेले ६० सहस्रांहून अधिक सैन्य मागे घेणार, अशी वृत्ते आल्यावर प्रथम विश्वास बसणे कठीण होते; मात्र सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी ‘चीनने सैन्य मागे घेतले असले, तरी सीमेवरील तणाव कायम आहे’, असे सांगितले होते. त्याचाच प्रत्यय आता आला. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्यास नकार दिला आहे. चीनने यापूर्वीही अनेक वेळा कराराचे उल्लंघन केले आहे.
आता भारतासमोर पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होणार आहे. पाकने अगदी काहीच दिवसांपूर्वी भारतासमवेत शांतता प्रस्थापित करण्याच्या बाता मारल्या, ‘शस्त्रसंधी करार पाळू’, असे सांगितले. याआधी चीनने शांतता प्रस्थापित करण्याचे तोंडी सांगितले. हे दोेघेही देश भारताचे कट्टर शत्रू आहेत. एकूण स्थिती पहाता, हे दोघे एकदम शांतता निर्माण करण्याच्या गोष्टी करून भारताला गाफील करत आहेत, असे दिसते. भारताला चर्चेच्या गुर्हाळात व्यस्त ठेवून दुसरीकडे कसली तरी सिद्धता ते करत असावेत, असा दाट संशय आल्यावाचून रहात नाही; कारण ते शत्रूच ! चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग एका बाजूला त्यांच्या सैन्याला युद्धासाठी सिद्धता करण्यासह लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये भरघोस तरतूद करत आहे. यातूनच चीनला युद्धज्वर चढला आहे, हे सिद्ध होते.
सध्या तो तैवानवर दादागिरी करत आहे, हाँगकाँगला कह्यात ठेवण्यासाठी दबावतंत्र वापरत आहे, तर भारताशी वाटाघाटी करत आहे. भारताशी युद्ध करून नमवण्यासाठी चीनला त्याची शक्ती पुष्कळ वाढवावी लागणार आहे. त्याला पाकचेही साहाय्य हवे आहे. तोपर्यंत त्याला अन्य छोट्या देशांचा विरोध मोडीत काढावा लागणार आहे. त्याची पूर्वसिद्धता जर चीन करत असेल, तर भारतालाही गप्प बसून चालणार नाही. चीनच्या प्रत्येक कृतीला तोडीस तोड कृती करून चीनची डाळ शिजणार नाही आणि पाकचीही छाती होणार नाही, याची काळजी भारतीय शासनकर्त्यांनी घेणे आणि जनमानस सिद्ध करणे आवश्यक आहे.