तमिळ भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा करतांना सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पदोपदी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची कृपा !
१. ‘अन्य राज्यांत दूरचित्रवाणी अथवा चलत्चित्रे यांच्या माध्यमातून होणारे प्रसारकार्य तमिळनाडू राज्यात करण्याची क्षमता नाही’, असे वाटणे, त्याच कालावधीत २ दूरचित्रवाहिन्यांनी धर्मसत्संग घेण्याविषयी संपर्क करणे; परंतु ते पूर्णत्वाला जाऊ न शकणे
‘सनातन संस्थेच्या कार्याचा प्रसार अन्य राज्यांत दूरचित्रवाणी अथवा चलत्चित्रे यांच्या माध्यमातून केला जातो, तसा तो तमिळनाडू राज्यात करण्याची क्षमता आमच्यामध्ये का नाही ?’, याविषयी माझ्या मनात कायम प्रश्न निर्माण होत असे. आम्हाला दोन वेळा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून प्रसार करण्याची संधी मिळाली. ‘श्री टी.व्ही.’ आणि ‘पोडीगई टी.व्ही.’ या २ दूरचित्रवाहिन्यांनी आम्हाला धर्मसत्संग घेण्याविषयी विचारले; मात्र ते पूर्णत्वाला जाऊ शकले नाही. आम्ही एकदा ‘श्री टी.व्ही.’च्या ‘स्टुडिओ’त ध्वनीचित्रीकरण करण्यासाठी गेलो होतो; पण ते चित्रीकरण त्यांना अपेक्षित असे झाले नाही. काही कारणाने आम्ही त्या वेळी ‘पोडीगई टी.व्ही.’शी संपर्क करू शकलो नाही आणि काही काळाने आम्ही केलेल्या संपर्काला त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.
२. तमिळ भाषेत ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्याविषयी विचारणा केल्यावर आनंद होणे आणि ‘गुरुदेवांच्या संकल्पाने ते साध्य होईल’, असा विश्वास वाटणे
या काळात परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने आम्हाला तमिळ भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्याची संधी मिळाली. आम्हाला ‘तमिळ भाषेत ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करू शकतो का ?’, असे विचारण्यात आल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. चेन्नई येथील आम्हा साधकांना चित्रीकरणाच्या संदर्भात कोणताही अनुभव नव्हता; पण ‘गुरुदेवांच्या संकल्पाने हे सत्संग करता येतील’, असा आम्हाला विश्वास वाटत होता.
मी याविषयी चेन्नई येथील साधकांशी बोलून घेतले आणि साधकांचा एक गट स्थापन केला. आम्हाला कुणालाही ‘एडिटिंग’ आणि ‘अपलोडींग’ या तांत्रिक सेवांविषयी फारशी माहिती नव्हती. त्यामुळे बेळगाव येथील साधकांनी आम्हाला साहाय्य करण्याचे मान्य केले. चेन्नई येथील साधकांनी या ‘ऑनलाईन’ सत्संगाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात चालू केला.
३. सत्संगाच्या चलत्चित्राचे (व्हिडिओ) चित्रीकरण करतांना आलेल्या अनुभूती
३ अ. ‘ऑनलाईन’ सत्संगाचे चित्रीकरण चांगले होण्यासाठी सर्व दिवे चालू ठेवून आवाज न होण्यासाठी पंखे बंद ठेवणे, उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुष्कळ घाम येणे, ‘घामाने भिजलेला तोंडवळा चित्रीकरणात कसा दिसत असेल ?’ अशी चिंता वाटणे; परंतु सत्संग पाहिल्यावर साधिकेचा तोंडवळा प्रफुल्लित दिसत असल्याचे आईने सांगणे : माझे यजमान श्री. रवि हे या सत्संगाचे चित्रीकरण करणे, सत्संग ‘यू ट्यूब’ वर ‘अपलोड’ करणे आणि त्याला ‘लाइव्ह’साठी पुढे पाठवणे, तसेच त्याचा प्रचार करणे, या सेवा करतात. आरंभी प्रतिदिन दुपारी २ वाजता आमच्या घराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बैठकीच्या खोलीत या सत्संगाचे चित्रीकरण होत असे. ‘चित्रीकरण करतांना चांगला प्रकाश असावा’, यासाठी सर्व दिवे चालू ठेवले जात होते आणि ‘आवाज होऊ नये’, यासाठी सर्व पंखे बंद ठेवण्यात येत होते. एप्रिल आणि मे या मासांत हे चित्रीकरण चालू होते. चेन्नईत या कालावधीत प्रचंड उन्हाळा असतो. सत्संगाचे चित्रीकरण संपेपर्यंत मी घामाने चिंब भिजून जात असे. हे चित्रीकरण चालू असतांना माझ्या मनात ‘माझी पंचाग्नीसमोर बसून तप करण्याची क्षमता नाही. त्यामुळे माझे प्रारब्ध न्यून करण्यासाठी प.पू. गुरुदेव माझ्याकडून हे तप करवून घेत आहेत’, असा भाव असे. चित्रीकरण झाल्यानंतर सत्संगात ‘माझा घामाने भिजलेला तोंडवळा कसा दिसत असेल ?’, अशी मला चिंता वाटत असे. मी याविषयी आईला सांगितल्यावर तिला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण आईने तो सत्संग पाहिला होता आणि त्यात ‘मी प्रफुल्लित दिसत होते’, असे तिने मला सांगितले.
काही दिवसांनी गुरुदेवांच्या कृपेमुळे ही अडचणही सुटली. माझ्या यजमानांनी चित्रीकरणाची पर्यायी व्यवस्था वातानाकूलित खोलीत केली. तेथे मी आरामात चित्रीकरण करू शकत होते.
३ आ. प.पू. गुरुदेवांची अखंड प्रीती अनुभवता येणे : आरंभी मला संहितेचे भाषांतर समयमर्यादेत पूर्ण करणे जमत नव्हते. काही वेळा सत्संगाच्या दिवशीच भाषांतर पूर्ण झाल्याने माझा हिरमोड होत असे. त्या काळात प.पू. गुरुदेवांचा जन्मोत्सवानिमित्तचा भावसोहळा संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून दाखवला होता. या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी प.पू. गुरुदेवांवर चित्रित केलेली चलत्चित्रे दाखवण्यात आली. या वर्षी प.पू. गुरुदेवांचे प्रत्यक्ष दर्शन न झाल्यानेे मला पुष्कळ वाईट वाटत होते. त्यानंतर अल्पावधीतच मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा ‘व्हिडिओ कॉल’ आला. त्यांनी अत्यंत प्रेमाने तेथील साधकांची ओळख करून दिली. त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझे मन कृतज्ञतेने भरून गेले. मला सद्गुरु पिंगळेकाकांमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवले. यामुळे माझा ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा करण्याचा उत्साह अधिकच वाढला.
३ इ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या रूपात प.पू. गुरुदेवांची कृपा अनुभवता येणे
३ इ १. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि त्यांच्या हातांच्या मुद्रा यांवरून संहितेचे आकलन होणे : प्रारंभी मला ‘धर्मसंवाद’ या हिंदी भाषेतील सत्संगाच्या संहितेचे सहजतेनेे आकलन होत होते आणि त्याचे भाषांतर करणे सोपे जात होते; मात्र काही दिवसांनी मला भाषांतर करणे कठीण वाटू लागले. मला त्यातील काही तांत्रिक शब्द समजत नसत. अशा वेळी मी ‘गूगल’वर त्याचा अर्थ शोधत असे अथवा एखाद्या साधकाला भ्रमणभाष करून शंकेचे निरसन करून घेत असे. त्यामुळे संहिता समजून घेणे, संहितेचे भाषांतर करणे आणि संहिता सादर करणे, या प्रक्रियेला वेळ लागू लागला. याच काळात श्री. श्रीराम लुकतुके यांनी मला सद्गुरु पिंगळेकाकांच्या आवाजातील ध्वनीमुद्रण पाठवायला आरंभ केला. यातून मला पुष्कळ शिकता आले. मला काही वाक्ये वाचूनही समजत नसत. सद्गुरु पिंगळेकाकांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मला त्या वाक्यांचे आकलन होऊ लागले. मला त्यांचे हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि त्यांच्या हातांच्या मुद्रा यांवरून पुष्कळ काही शिकता आले. ते एखादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सोपी उदाहरणे आणि न्यूनतम शब्दांत स्पष्टीकरण देत असत. मला संकल्पना स्पष्ट झाल्यावर भाषांतर करणे सोपे जात असे आणि सत्संग अधिक आत्मविश्वासाने चांगल्या प्रकारे सादर करता येत असे.
३ इ २. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या वाणीतून चैतन्य मिळून हलकेपणा जाणवणे : सद्गुरु पिंगळेकाकांच्या आवाजातील हे ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) ‘एडिट’ केलेले नसल्याने त्यात अल्पावधीसाठी काहीच संवाद नसायचे अथवा काही वेळा सद्गुरु पिंगळेकाकांचे मराठीतील अनौपचारिक बोलणेही असायचे. त्यांचे मराठीतील बोलणे ऐकून मला चैतन्य मिळून हलकेपणा जाणवत असे; मात्र ते शांत असतांना मला त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने जाणवत असे. त्या वेळी माझ्यात ‘मी विद्यार्थिनीच्या रूपात त्यांच्या समोर बसले असून त्यांच्याकडून येणारे दैवी ज्ञान ग्रहण करत आहे’, असा भाव निर्माण होऊन मला अवर्णनीय आनंदाची अनुभूती येत असे.
३ ई. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सत्संगासमवेत २ ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग आणि धर्माभिमान्यांसाठी १ सत्संग चालू झाल्याने कोरोना महामारीचा हा शापही वरदान ठरणे : चेन्नई येथील साधकांच्या गुरुसेवा आणि प्रसारसेवा करण्याच्या तीव्र तळमळीमुळे ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाल्यावर काही दिवसांनी आठवड्यातून दोन वेळा ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग चालू झाला. धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाला.
गुरुदेवांनी ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा देऊन केलेल्या कृपेमुळे मला कधीही कोरोना महामारीचा ताण आला नाही अथवा भीती वाटली नाही. ‘घरातील आरामदायी वातावरणात बसून काही क्षणांतच सहस्रो लोकांपर्यंत पोचवणार्या या प्रसारसेवेत सहभागी व्हायला मिळेल’, असे मला कधीही वाटले नव्हते. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने महामारीचा हा शापही वरदान ठरला !
३ उ. ‘परात्पर गुरुदेवांच्या संकल्पाने अल्पावधीत सर्व अडथळे दूर होतात’, हे लक्षात येणे : या कालावधीत ‘परात्पर गुरुदेवांच्या संकल्पाने अल्पावधीत सर्व अडथळे दूर होतात’, हे माझ्या लक्षात आले. एकदा केवळ आमच्या घराजवळ असलेल्या विद्युततारांच्या दुरुस्तीसाठी पुष्कळ वेळ वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. दळणवळण बंदीचा काळ असूनही विद्युतविभागाच्या कर्मचार्यांनी ती दुरुस्ती दुपारी ३.३० वाजण्यापूर्वी पूर्ण केली आणि वीजपुरवठा चालू केला. त्यामुळे मला त्या दिवशी ४ वाजता सत्संगाचे चित्रीकरण करता आले.
३ ऊ. ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा ‘केवळ गुरुदेवांच्या संकल्पाने होत आहे’, याची पदोपदी जाणीव होणे : अन्य भाषांतील ‘ऑनलाईन’ सत्संगांचे परिपूर्ण सादरीकरण पाहून ‘सत्संग इतक्या परिपूर्ण पद्धतीने सादर करण्याची माझी क्षमता नाही’, असा विचार येऊन मला काहीसे निराश वाटत होते. प्रतिदिन सत्संगाचा समारोप करतांना ‘उद्या संध्याकाळी ७ वाजता अधिक मूल्यवान माहितीसह परत भेटू’, असे वाक्य म्हटल्यावर ‘प.पू. गुरुदेव हे वाक्य म्हणत आहेत’, असे मला जाणवत असे. ‘केवळ गुरुदेवांच्या संकल्पामुळे मला दुसर्या दिवशीचा सत्संग घेता येईल’, असा आत्मविश्वास सातत्याने वाटत आहे.
– पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (२८.६.२०२०)
‘ऑनलाईन’सत्संगाची सेवा करतांना चेन्नई येथील साधकांना आलेल्या अनुभूती
१. ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा केल्यामुळे मनातील विचार न्यून होऊन हलकेपणा जाणवणे
‘गेले काही मास विविध प्रकारच्या आर्थिक आणि अन्य अडचणी यांमुळे मी पुष्कळ निराश झालो होतो. मी मधूनमधून दुःखी असायचो; मात्र गेल्या काही दिवसांपासून मी पुष्कळ सेवा करायला आरंभ केला आहे. त्यामुळे मला हलकेपणा जाणवत आहे. ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा केल्यामुळे माझ्या मनातील अडचणींविषयीचे विचारही उणावले आहेत.’ – श्री. जयकुमार
२. अतिसाराचा त्रास होत असल्याने ‘ऑनलाईन’ सत्संग घेऊ शकणार नाही’, असे वाटणे; मात्र ‘ऑनलाईन’ सत्संग घेतांना त्रासाची जाणीव न होणे
‘२८.६.२०२० या दिवशी पहाटेपासून मला अतिसाराचा त्रास होऊ लागला. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्या त्रासाची तीव्रता वाढली आणि तो असहनीय झाला. त्या दिवशी सकाळी ११.३० वाजता साधकांसाठी असलेला सत्संग मला घ्यायचा होता. माझी स्थिती पहाता ‘मला ते जमणार नाही’, असे वाटू लागले. त्यामुळे माझ्या मनात ‘श्री. जय यांना तो सत्संग घ्यायला सांगूया’, असे विचार येऊ लागले; पण त्याच वेळी ‘आजच्या सत्संगाला मी निमंत्रित केलेले पुष्कळ जिज्ञासू उपस्थित रहाणार आहेत’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी सत्संगाला उपस्थित रहाण्याचे ठरवले. सत्संग चालू झाल्यावर मी मला होत असलेला पोटाचा त्रास पूर्णपणे विसरून गेलो. माझी सत्संग घेण्याची सेवा विनाअडथळा पूर्ण झाली. सत्संग संपल्यावरच मला पोटाच्या त्रासाची जाणीव झाली. ‘त्रास होत असतांनाही सत्संगाची सेवा करता येणे’, ही माझ्यासाठी एक मोठी अनुभूती आहे.’ – श्री. बालाजी
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |