दिवसभरात ७६२ कोरोनाबाधित, तर ४ जणांचा मृत्यू
गोव्यात कोरोनाच्या हाहा:काराचा तिसरा दिवस
पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात १७ एप्रिल या दिवशी कोरोनाबाधित ७६२ नवीन रुग्ण सापडले आहेत, तर कोरोनाचा संसर्ग झाल्याने ४ जणांचे निधन झाले आहे. निधन झालेल्यांची एकूण संख्या आता ८७२ झाली आहे. कोरोनापासून ४३६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ सहस्र ६४३ झाली आहे. राज्यात कोरोनाविषयक ३ सहस्र ४९४ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण २१.८१ टक्के आहे.
अधिक प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण असलेली केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत. मडगाव ७५७, पर्वरी ५३१, पणजी ५०८, फोंडा ४६२, म्हापसा ४५१, कांदोळी ४३४, वास्को ३९८ आणि कुठ्ठाळी ३८२. कोरोनाचा संसर्ग झाल्याने करंझाळे येथील ४७ वर्षीय रुग्ण आणि पणजी येथील ६८ वर्षीय रुग्ण या दोन्ही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत त्यांचे निधन झाले.