पर्यटक टॅक्सीचालकांना पणजी येथील आझाद मैदानात आंदोलन चालू ठेवण्याची अनुमती शासनाने नाकारल्याने तणावाचे वातावरण
|
पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी पर्यटक टॅक्सीचालकांना येथील आझाद मैदानात आंदोलन चालू ठेवण्याची अनुमती नाकारली. यामुळे १७ एप्रिल या दिवशी आझाद मैदानात सकाळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पर्यटक टॅक्सीचालकांनी पर्यटक टॅक्सी बंद ठेवून आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
‘गोवा माईल्स’ ही अॅपस्थित टॅक्सी सेवा रहित करण्याच्या मागणीवरून आझाद मैदान पणजी येथे पर्यटक टॅक्सीचालक गेले ११ दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची अनुमती १६ एप्रिल या दिवशी संपुष्टात आली आणि यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने आंदोलन करण्यास पुन्हा अनुमती देण्यास नकार दर्शवला आहे. १७ एप्रिल या दिवशी पर्यटक टॅक्सीचालक आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमले होते; मात्र पोलिसांनी त्यांना मैदानात प्रवेश नाकारला. या वेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.