एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

रुग्णालय म्हणजे आरोग्य केंद्र ! जनतेला आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास, कुणी रोगग्रस्त झाल्यास ज्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन आणि उपचार घेऊन व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते, असे ठिकाण ! मात्र कलिच्या प्रभावापासून ही ठिकाणेही सुटलेली नाहीत. त्यामुळे या आरोग्यकेंद्रांची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. एका साधिकेने एका मोठ्या रुग्णालयात अनुभवलेली अशी विदारक स्थिती येथे देत आहोत.

गेल्या रविवारच्या म्हणजे ११ एप्रिल २०२१ या दिवशीच्या लेखात आपण साहित्य आणि वास्तू, रुग्णालयातील स्वच्छतेची ऐशी-तैशी, तांब्या किंवा ‘मग’ ऐवजी सलाईनच्या बाटलीचा वरचा भाग कापून केलेला डबा ठेवलेला असणे आणि अंघोळ न केल्याने रुग्ण बरे होण्याऐवजी त्यांच्या त्रासांत वाढ होणे यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

६. जनसेवेच्या माध्यमातून ईश्‍वरसेवा करण्याची संधी लाभलेल्या रुग्णालयासारख्या ठिकाणी जनतेला पाण्यासाठी लुबाडले जाणे!

रुग्णालयात पाणी नाही, तर बाहेर कुठे पाण्याची सोय आहे का ? हे पहातांना लक्षात आले की, रुग्णालयाच्या सभोवताली कुठेच पाणी नाही. एके ठिकाणी मात्र पाणी विकत दिले जात होते ! अंघोळीकरता १ बादली गरम पाणी हवे असल्यास २० रुपये मोजावे लागतात. कपडे धुणे, भांडी धुणे यांसाठी पाणी हवे असल्यास ते कपड्यांच्या आणि भांड्यांचा संख्येवर ठरवले जाते. एवढे मूल्य देऊन पाणी घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. (रुग्णालयासारख्या ठिकाणी पाणी नसणे, हे शासनासाठीलज्जास्पदच ! – संकलक)

७. आहार

७ अ. नियोजन नसल्याने अन्न वाया जाणे : रुग्णालयाकडून रुग्णांना जेवण मिळते. मात्र हे जेवण चांगले नसते; म्हणून बहुतेक जण घरून अथवा बाहेरून जेवण मागवतात. रुग्णांची संख्या, त्यांपैकी किती जण रुग्णालयातील जेवण घेणार, याचा काही अभ्यास न करताच स्वयंपाक केला जातो. त्यामुळे बरेच अन्न वाया जाते. जेवण आणतांना ताटे वाढूनच आणतात. त्यामुळे ते सांडते अथवा पदार्थ एकमेकांत मिसळतात. या कारणानेही अन्न वाया जाते. (एकीकडे देशात जनता उपासमारीमुळे आत्महत्या करत आहे, तर दुसरीकडे अन्न असे वाया घालवले जात आहे ! या ठिकाणी अन्नाला ब्रह्म मानणार्‍या हिंदु धर्माची महानता लक्षात येते. यातून धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अपरिहार्यताही अंकित होते. – संकलक)

७ आ. अन्नासंदर्भातील स्वच्छतेविषयीची उदासीनता : रुग्णांसाठी जेवण आणतांना ते ताटांत वाढूनच आणलेले असते. ही ताटे न झाकता उघडीच आणतात. स्ट्रेचरवरून (रुग्णाला नेण्यासाठीची चाकाची गाडी) अथवा चाकाच्या आसंदीवरून (खुर्ची) रुग्णांना ने-आण करत असतांना त्याच ऊर्ध्ववाहिकेमधून (लिफ्टमधून) अन्न वाढलेल्या या उघड्या ताटांची ने-आण केली जाते. काही वेळा स्ट्रेचरवरूनच या ताटांची ने-आण केली जाते ! अशा वेळी उघड्या अन्नात रोगाणू जाऊन त्या अन्नाच्या माध्यमातून रुग्णाला नवीन रोगाची लागण होऊ शकते, याचा विचार केला जात नाही. (रुग्णालयाच्या ठिकाणीच जर आरोग्याविषयी एवढी उदासीनता असेल, तर जनतेने जायचे कुठे ? – संकलक)

७ इ. उकळलेले पाणी देतांना वस्तुनिष्ठ विचार केलेला नसणे : रुग्णांना पिण्यासाठी उकळलेले पाणी दिले जाते. हे पाणी प्रतिदिन सायंकाळी एकदाच मिळते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सायंकाळपर्यंत पुरेल इतके पाणी घेऊन ते भरून ठेवावे लागते. हे पाणी उकळते असते. रुग्णांना याची कल्पना नसल्याने आणि सर्वांकडेच गरम पाणी भरून ठेवण्यासाठी थर्मास इत्यादीची सोय नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. त्यातूनही कुणी हे पाणी भरून घ्यायचे म्हटले, तर त्याचे तापमान इतके अधिक असते की, साध्या प्लास्टिकच्या बाटलीत घातल्यास बाटलीच वितळते ! (सामान्यज्ञानाचा अभाव असलेले कर्मचारी ! पाट्याटाकूपणाचे उदाहरण ! – संकलक)

(ही गैरसोय टाळण्याकरता उकळलेले पाणी ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी स्टीलची पिंपे अन् काही पेले ठेवू शकतो.)

८. रुग्णालयातील आधुनिक वैद्यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सर्व कर्मचार्‍यांचे वागणे

८ अ. रुग्ण अथवा त्याच्या समवेत आलेल्या व्यक्तीलाच रुग्णासाठी आवश्यक त्या सेवा करायला सांगणारे रुग्णालयातील कर्तव्यशून्य कर्मचारी !

८ अ १. एका उशीच्या अभ्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा घ्यावा लागणे आणि घाणेरडा अभ्रा आणून ‘तुम्हीच घालून घ्या’ असे सांगणे : आम्हाला उशीचा अभ्रा मिळाला नव्हता. त्याविषयी सांगितल्यावर तेथील परिचारिका (नर्स) म्हणाली, ‘‘काही वेळाने देते.’’ प्रत्यक्षात पुष्कळ वेळ प्रतीक्षा करूनही तिने अभ्रा न दिल्याने पुन्हा तिच्याकडे विचारणा केली. या वेळीही तिचे उत्तर होते, ‘थोड्या वेळात पाठवते.’

२-३ वेळा पाठपुरावा केल्यावर एक कर्मचारी आला आणि अत्यंत घाणेरडा असा एक अभ्रा देऊन म्हणाला, ‘‘तुम्ही घालून घ्या.’’ त्यालाच घालून द्यायला सांगितले असता तो म्हणाला, ‘‘तुला घालता येत नाही का ?’’ एकूणच तेथील कर्मचार्‍यांना स्वतःच्या कर्तव्याची जाण नाही, असे लक्षात आले. सर्व सेवा (कामे) रुग्ण अथवा रुग्णासमवेत आलेल्या व्यक्तींनाच करायला सांगतात.

८ अ २. रुग्णाचे कपडे पालटणे, बेडपॅन देणे यांसारख्या सेवाही रुग्णाला अथवा त्याच्या समवेत आलेल्या व्यक्तीलाच करायला सांगणे : रुग्णांना तपासण्यासाठी आधुनिक वैद्य आल्यास अथवा रुग्णाला जागेवरच कपडे पालटायचे किंवा मल-मूत्र विसर्जनासाठी भांडे (बेडपॅन) द्यायचे असल्यास रुग्णाभोवती लावण्यासाठी ‘स्टॅन्ड’चे पडदे आहेत; मात्र ते दूर ठेवलेले असतात. त्यामुळे आवश्यक त्या वेळी ते आणणे, रुग्णांसाठी औषधे आणणे, त्यांचे वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आणणे, चाकाची खुर्ची आणणे अशा प्रकारची सर्व कामे रुग्णालयातील परिचारिका अथवा कर्मचारी यांनी करायची असतात. या रुग्णालयात मात्र ही सर्व कामे रुग्णासमवेत असलेल्या व्यक्तींनाच करायला सांगितली जातात. काही रुग्णांसमवेत कुणीच नसते. अशा रुग्णांचे पुष्कळ हाल होतात. (सर्व कामे रुग्णासमवेतच्या व्यक्तींनी करायची, तर परिचारिका आणि कर्मचारी यांना वेतन देऊन पोसायचे कशाला ? – संकलक) 

८ आ. रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या ‘चोर ते चोर, वर शिरजोर’ या वृत्तीची उदाहरणे 

८ आ १. रुग्णांना स्वच्छ पलंगपोस न देणे आणि त्यांना स्वतःचा पलंगपोसही वापरू न दणे : रुग्णाच्या बाजूलाच एक रिकामा पलंग होता. मी परिचारिकेला विचारून त्या पलंगावर बसण्याची अनुमती घेतली. त्या पलंगावर बसण्यासाठी आम्ही नेलेला पलंगपोस मी घातला. त्या वेळी परिचारिका पलंगपोस घालू देत नव्हती. वस्तूस्थिती अशी आहे की, रिकाम्या पलंगांवर स्वच्छ पलंगपोस घालणे तर लांबच, रुग्णांनासुद्धा स्वच्छ पलंगपोस देत नाहीत !

८ आ २. रुग्ण येणार असल्याचे खोटे सांगून रिकाम्या पलंगावर बसू न देणे : रात्री स्वच्छता करणारी एक महिला कर्मचारी आली. तिने मला रिकाम्या पलंगावर बसलेले पाहिले आणि मला ‘तिथे बसायचे नाही’, असे सांगितले. तिला कारण विचारल्यावर एक नवीन रुग्ण येणार असल्याचे तिने सांगितले. त्यावर रुग्ण आल्यावर उठणार असल्याचे मी सांगितल्यावर ती शांत राहिली. प्रत्यक्षात दुसर्‍या दिवशीही तिथे कुणीच आले नाही.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– एक साधिका (६.४.२०१६)

आरोग्य साहाय्य समितीची वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. तुम्हालाही वैद्यकीय क्षेत्रातील असे कटू अनुभव आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आरोग्य साहाय्य समितीस कळवा.

स्वतःचे अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org