महायुद्ध, भूकंप यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्या समस्यांना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?
पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अशा प्रसंगी सर्वत्र विध्वंस होणे, आग लागणेे यांसारख्या घटना घडतात. गल्लोगल्ली मृतदेह पडलेले असतात. अशा घटना पाहून वा ऐकून अनेकांना मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. बर्याच जणांना नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. असे झाल्यास मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे. याचसमवेत अशा प्रकारचे त्रास होऊ नयेत, म्हणजेच मनाचे संतुलन ढळू न देता प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी करायच्या उपाययोजना पुढे सांगितल्या आहेत.
(भाग १)
आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्या मानसिक समस्यांवरील काही उपाययोजना
१. आपत्काळातील भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी उपयुक्त असलेल्या स्वयंसूचना-उपचारपद्धतीचा वापर करावा ! : खाली दिलेल्या दृष्टीकोनांपैकी कुठलेही दृष्टीकोन घेऊन सूचना देता येते.
१ अ. सकारात्मकता
१. येणार्या आपत्काळात साधकांनी साधनेची गती वाढण्यासाठी ‘सकारात्मकता’ हा गुण आत्मसात केल्यास त्यांच्यामध्ये ईश्वराची गती पकडण्याची क्षमता निर्माण होईल.
२. १०० टक्के सकारात्मक राहून केलेल्या कोणत्याही कृतीची फलनिष्पत्ती १०० टक्के असते.
३. सकारात्मक राहिल्याने कृतज्ञताभाव वाढण्यासही साहाय्य होते; कारण ‘काहीही घडले, तरी ते माझ्या साधनेला आवश्यक आहे’, असा भाव साधकात निर्माण झालेला असतो.
४. सकारात्मक राहिल्याने ‘भावनाशीलता’ हा स्वभावदोष आणि वाईट शक्तींचा त्रास यांवर नियंत्रण मिळवता येते.’
– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, गोवा.(१०.७.२०१७)
१ आ. मनोबल मंत्र
आत्मबळ वाढण्यासाठी
ज्याके परि णो नमाश्मानं तन्वं कृधि ।
वीडुर्वरीयोऽरातीरप द्वेषांस्या कृधि ॥ – अथर्ववेद, काण्ड १, सूक्त २, खण्ड २
अर्थ : हे इंद्रदेवा, आमचे शरीर सुदृढ आणि दगडाप्रमाणे बळकट बनवून शत्रूंना (दोषांना) आमच्यापासून पूर्णपणे दूर कर.
हा मंत्र दिवसातून एकदा १०८ वेळा म्हणावा.
१. प्रस्तुत लेखात उदाहरणादाखल दिलेल्या स्वयंसूचना सनातनच्या साधिका आणि मानसोपचार-तज्ञ डॉ. (सौ.) आशा ठक्कर, गोवा यांनी बनवल्या आहेत. वाचकांनी या सूचनांमधील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत आणि आवश्यकता वाटल्यास त्यांत स्वतःच्या मनाला स्वीकारता येतील, असे पालट करून स्वयंसूचना बनवाव्यात. या स्वयंसूचनांच्या धर्तीवर विविध संकटांच्या संदर्भातही स्वयंसूचना बनवता येतील.
२. या लेखात दिलेल्या काही उदाहरणांमध्ये स्वयंसूचनांच्या पद्धतींनुसार स्वयंसूचना दिल्या आहेत. त्या पद्धतींपैकी वाचकांना जी सोयीची वाटेल किंवा आवडेल, त्या पद्धतीनुसार स्वयंसूचना द्यावी.
३. स्वयंसूचनांच्या विविध पद्धतींची सविस्तर माहिती, स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंवर स्वयंसूचना कशा बनवाव्यात इत्यादींविषयीचे सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ ‘स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष-निर्मूलन’ यामध्ये केले आहे. एकूणच ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ सविस्तरपणे समजून घेण्यासाठी सनातनची यासंबंधीची ग्रंथमालिका वाचा किंवा सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेला भेट द्या – www.Sanatan.org/mr/personality-development
२. पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्ती चालू असतांना त्यांच्या संदर्भात येणारे अयोग्य विचार किंवा अयोग्य भावना यांवर मात करण्यासाठी द्यायच्या स्वयंसूचनांची उदाहरणे
२ अ. अयोग्य विचार : सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहून मन अस्वस्थ होऊन दुःख वाटणे (परिस्थिती स्वीकारता न येणे)
२ अ १. स्वयंसूचना : ज्या वेळी सध्या आपत्काळामुळे निर्माण झालेली प्रतिकूलता पाहून मी दुःखी होईन, त्या वेळी ‘हे सर्व ईश्वरेच्छेने घडत असून संभाव्य आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी भगवंत सर्वांच्या मनाची सिद्धता करून घेत आहे’, याची जाणीव होऊन ‘देव मला यातून काय शिकवत आहे ?’, याचे मी चिंतन करीन.
२ आ. अयोग्य विचार : ‘आपत्कालीन स्थितीत साधनेचे प्रयत्न करणे कठीण आहे’, असे वाटणे
२ आ १. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘आपत्कालीन स्थितीत साधनेचे प्रयत्न करणे कठीण आहे’, असे मला वाटेल, त्या वेळी ‘सद्यःस्थितीतही मनाच्या स्तरावरील साधनेचे सर्व प्रयत्न (स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भाववृद्धीचे प्रयत्न आदी) मी सहज करू शकतो’, याची मला जाणीव होईल आणि संपत्काळापेक्षा आपत्काळामध्ये वेळेचे मूल्य अनेक पटींनी वाढून प्रयत्नांचे फळही काही पटींनी मिळते; म्हणून मी सकारात्मक राहून प्रयत्न करीन.
२ इ. अयोग्य विचार : ‘आयुष्यातील एवढे महत्त्वाचे दिवस मी घरी राहून व्यर्थ घालवत आहे’, असे विचार येणे
२ इ १. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘आयुष्यातील एवढे महत्त्वाचे दिवस मी घरी राहून व्यर्थ घालवत आहे’, असा विचार येईल, त्या वेळी ‘सद्यःस्थितीत आपत्काळामुळे ‘नागरिकांनी घरी रहावे’, असा प्रशासनाने आदेश दिल्याने त्याचे तंतोतंत पालन करणे, ही माझी साधना आहे’, याची मला जाणीव होईल आणि ‘मी घरबसल्या व्यष्टी अन् समष्टी साधनेचे कोणते प्रयत्न करू शकतो ?’, हे उत्तरदायी साधकांना विचारीन.
२ ई. अयोग्य विचार : ‘मला घरी राहून पुष्कळ कंटाळा आला आहे’, असा विचार येणे
२ ई १. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘घरी राहून मला पुष्कळ कंटाळा आला आहे’, असा विचार येईल, त्या वेळी मी ‘घरातील कामे सेवा म्हणून केली, तर माझी साधना होणार आहे, तसेच मी घरबसल्या व्यष्टी साधना (स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भाववृद्धीचे प्रयत्न आणि नामजपादी उपाय) अन् शक्य ती समष्टी सेवा करणे श्री गुरूंना अपेक्षित आहे’, याची जाणीव होऊन मी त्यासाठी प्रयत्न करीन.
२ ऊ. अयोग्य विचार : ‘अशा कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल माझ्यात नाही’, असे वाटून ताण येणे
२ ऊ १. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल माझ्यात नाही’, असे वाटून मला ताण येईल, त्या वेळी ‘दयाघन भगवंत चांगल्या आणि कटू अशा दोन्ही परिस्थितींमध्ये माझ्या समवेत आहे. जर मी साधना केली, तर प्रतिकूल परिस्थितीत मी काय करणे आवश्यक आहे ?’, ते सुचवून तोच माझे मनोबल वाढवणार आहे’, याची मला जाणीव होऊन मी भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवीन.
१. प्रसंग : ‘मला साथीच्या रोगांचा संसर्ग होईल’, या विचाराने भीती वाटणे
१ अ. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘मला साथीच्या आजाराचा संसर्ग होईल’, या विचाराने भीती निर्माण होईल, त्या वेळी ‘मी आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे’, याची मी स्वतःला आठवण करून देईन आणि दिवसभरात अधिकाधिक वेळ कोरोनापासून सुरक्षित रहाण्यासाठी विशेष / उपयुक्त नामजप अन् प्रार्थना करून सत्मध्ये राहीन.
२. प्रसंग : ‘मला साथीच्या आजाराची लागण झाल्यास मृत्यू होईल’, अशी भीती वाटणे
२ अ. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘मला साथीच्या आजाराचा संसर्ग झाल्यास माझा मृत्यू होईल’, असा विचार येईल, त्या वेळी ‘अनेक लोक याच्यातून बरे होत आहेत आणि आता लस ही उपलब्ध आहे, याची मला जाणीव होऊन मी सकारात्मक राहीन अन् कुटुंबीय, हितचिंतक, तसेच सरकारी यंत्रणा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्याची योग्य ती काळजी घेईन.
(क्रमशः पुढच्या रविवारी)