ह.भ.प. मंगलाताई कांबळे (वय ७६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन !
पुणे – ह.भ.प. मंगलाताई कांबळे (वय ७६ वर्षे) यांचे १७ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या ह.भ.प. मंगलाताई या अतिशय देवभक्त होत्या. समाजप्रबोधन आणि जनजागृती यांसाठी त्यांनी कीर्तनकार-प्रवचनकार होऊन परदेशातही धर्म-अध्यात्माचा प्रसार केला. हिंदु समाजाचे चैतन्य जागृत करण्यासाठी त्यांनी विश्व हिंदु परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष म्हणून कार्यही पाहिले. त्यांनी पंढरपूरच्या वारीला केवळ महिलांची स्वतंत्र दिंडीसुद्धा चालू केली होती. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित धर्मसभा, आंदोलने यांतही त्यांची वक्त्या म्हणून उपस्थिती होती. सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात झालेल्या मोशी येथील आंदोलनात त्यांनी सक्रीय पुढाकार घेतला होता. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक होत्या. त्यांच्या कीर्तनातून, प्रवचनातून सनातन संस्थेविषयी, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ विषयी माहिती सांगून त्या समाजप्रबोधनही करत असत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असून त्यांचे कार्य सतत प्रेरणादायी राहील, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी कळवले आहे.