पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ५ पर्यंत ५७.८१ टक्के मतदान

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १७ एप्रिल – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल या दिवशी मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ३४ टक्के, तर सायंकाळी ५ पर्यंत ५७.८१ टक्के मतदान झाले होते. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल या दिवशी मतदान घेण्यात आले असून २ मे या दिवशी निकाल घोषित होणार आहे.

भाजप उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यात प्रमुख लढत होत असून निवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी असली, तरी या मतदारसंघात मतदानाच्या निमित्ताने संचारबंदी शिथील करण्यात आली होती.

या मतदारसंघात एकूण ३ लाख ४० सहस्र ८८९ मतदार असून ५२४ मतदान केंद्रावर हे मतदान पार पडले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ३ सहस्र २५२ जणांनी टपाली मतदानाच्या माध्यमातून मतदान केले आहे.