कोरोनाच्या तिसर्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज रहा ! – मुख्यमंत्री
मुंबई – कोरोनाच्या किती किती लाटा येतील ? ते आज सांगू शकत नाही; मात्र आता राज्यातील उद्योगांनीसुद्धा येणार्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ एप्रिल या दिवशी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ ‘कॉन्फरन्स’द्वारे राज्यातील विविध उद्योगक्षेत्रांतील प्रतिनिधींशी संवाद साधून राज्याला सद्यस्थितीत आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी सहकार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. या बैठकीला उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख आदी अग्रणी उद्योजक ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
१. कोरोना सुसंगत कार्यप्रणाली स्वीकारणे, चाचणी आणि लसीकरण यांच्या सुविधा उभारणे, कामगार अन् कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष यंत्रणा निर्माण करणे, आपल्या परिसरात विलगीकरण व्यवस्था उभारणे, खाटा उपलब्ध ठेवणे, ‘वर्क फ्रॉम होम’ची यंत्रणा विकसित करणे, कामगारांच्या कामाच्या वेळांत अनुरूप पालट करणे आदी व्यवस्था करायला हवी.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील रुग्णांची स्थिती पहाता ऑक्सिजन उपलब्ध होण्याविषयी १६ एप्रिलला सायंकाळी संपर्क केला होता; मात्र ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने बोलणे होऊ शकले नाही; मात्र केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे.
३. कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग-व्यवसाय यांची हानी होऊ नये आणि अर्थचक्राला झळ बसू नये, यासाठी उद्योगांनी आतापासून कोरोनाला सुसंगत कार्यपद्धतींचे नियोजन करावे. त्याप्रमाणे सुविधा उभाराव्यात आणि कार्यपद्धतींचा अवलंब करावा.
उद्योगांसाठी तातडीने ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !
राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयी २ ‘टास्क फोर्स’ आहेत, त्याप्रमाणे कोरोनाविषयी राज्यशासनाच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक ‘टास्क फोर्स’ तातडीने निर्माण करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिली. राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे. विलगीकरण, खाटांची सुविधा वाढवणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढवणे यांमध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही चालू करतील, असे या वेळी उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगितले.