कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण चाचणीचा अहवाल लवकर द्या !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईच्या आयुक्तांना आदेश !
मुंबई – रुग्णालयातील रुग्णशय्यांचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व सुविधांवर विशेष लक्ष द्या. रुग्णशय्या आणखी वाढवण्यावर भर द्यावा. शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ एप्रिल या दिवशी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेतला. या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा अहवाल २४ घंट्यांच्या आत देण्याची सूचना प्रयोगशाळांना देण्यात आली आहे ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका
मुंबईतील रुग्णांमध्ये ८५ टक्के रुग्ण कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. शहरात १५३ कोरोना रुग्णालये आहेत. त्यामध्ये सध्या २० सहस्र ४०० रुग्णशय्या आहेत. येत्या आठवड्यात ही संख्या २२ सहस्र होईल. मोठ्या खासगी रुग्णालयांमधून बरे होत आलेल्या आणि प्राणवायू पुरवठ्याची आवश्यकता नसलेल्या रुग्णांना स्थानांतरित करण्यासाठी हॉटेल्स संलग्न करून देण्यात येत आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल २४ घंट्यांच्या आत देण्याची सूचना सर्व प्रयोगशाळांना देण्यात आली आहे.