औषध आस्थापनांना केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला औषध न देण्याची सूचना !

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

नवाब मलिक

मुंबई – महाराष्ट्र शासनाने औषधांच्या आस्थापनांशी संपर्क साधून कोरोनावरील औषधांची मागणी केल्यानंतर केंद्रशासनाने त्या आस्थापनांना महाराष्ट्राला औषधे न देण्याची सूचना केली आहे. औषधी दिल्यास कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी १७ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

या वेळी केंद्रशासनाला चेतावणी देतांना नवाब मलिक म्हणाले, ‘‘लोकांचा जीव वाचवण्यासाठी जी औषधे आहेत, त्यांना विकण्याची तात्काळ अनुमती द्यावी. अनुमती दिली नाही, तर आमच्याकडे अन्य कोणताही पर्याय नाही. ही सगळी औषधे महाराष्ट्राच्या भूमीवर आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून या औषधांचे जनतेला वाटप केले जाईल. याविना आमच्याकडे अन्य पर्याय नाही. अशीच परिस्थिती देशात ऑक्सिजनविषयीही आहे. केंद्रशासनाचे दायित्व आहे की, देशातील सर्व स्टील कारखान्यांची क्षमता अल्प केली पाहिजे. तेथील ऑक्सिजनचा साठा रुग्णांसाठी वापरला पाहिजे.’’

नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करावेत ! – केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

केशव उपाध्ये

नवाब मलिक यांनी केलेले आरोप निराधार आहेत. त्यांच्याकडे याचे पुरावे असतील, तर आरोप सिद्ध करावेत, अन्यथा माफी मागावी. हा राज्य सरकारचा अधिकृत पवित्रा आहे का ? तसे असल्यास मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन वस्तूस्थिती स्पष्ट करावी, तसेच निराधार आरोप करणार्‍यांना मंत्र्यांना रोखावे.