कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा !
|
नवी देहली – हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली. याविषयीची माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे, ‘आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरिजी यांच्यासमवेत आज दूरभाषवर बोललो. सर्व संतांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले.
सर्व संत प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करत आहेत. मी यासाठी संतांचे आभार मानले आहेत. २ पवित्र स्नाने झाली आहेत. आता कोरोना संकटामुळे कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा, असे आवाहन मी केले आहे. हे या संकटाविरुद्धच्या लढ्याला बळ देईल.’
मैंने प्रार्थना की है कि दो शाही स्नान हो चुके हैं और अब कुंभ को कोरोना के संकट के चलते प्रतीकात्मक ही रखा जाए। इससे इस संकट से लड़ाई को एक ताकत मिलेगी। @AvdheshanandG
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
७० हून अधिक साधू कोरोनाबाधित
कुंभमेळ्यात सहभागी झालेल्यांपैकी ७० साधू आतापर्यंत कोरोनाबाधित झाले आहेत. मोठ्या संख्येने साधूंची चाचणी घेण्यात येत आहे. निरंजनी आखाड्याच्या १७ साधूंना संसर्ग झाला आहे. या आखाड्याने १७ एप्रिल या दिवशी कुंभमेळा संपवण्याचे आवाहन केले आहे. अखिल भारतीय पंच निर्वाणी अखाडा येथील महामंडलेश्वर कपिल देवदास (वय ६५ वर्षे) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
स्वामी अवधेशानंद यांनीही केले आवाहन
पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरभाषवर बोलल्यानंतर जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि यांनी ट्वीट करून म्हटले, ‘आम्ही माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान करतो. स्वतःचे आणि इतरांच्या जीवनाचे रक्षण करणे हे एक उत्तम पुण्य आहे. माझे धर्मपरायण जनतेला आवाहन आहे की, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन नियमांचे पालन करा.’ |