कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या कालावधीत एका सरकारी रुग्णालयाची रुग्णांच्या संदर्भात लक्षात आलेली दायित्वशून्यता !

१. नर्मदा परिक्रमा करून आल्यावर ‘कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये’, या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेणे आणि सरकारी सूचनेप्रमाणे सरकारी रुग्णालयात चाचणीसाठी जाणे

‘नर्मदामाईच्या कृपेने नर्मदा परिक्रमा करून २४.३.२०२० या दिवशी मी सकाळी माझ्या निवासस्थानी पोचलो. कोरोना विषाणूंच्या साथीच्या अंतर्गत मी घरात स्वतःचे विलगीकरण करून घेण्याचे आधीच ठरवले होते आणि योग्य प्रकारे सर्व सूचनांचे पालनसुद्धा करत होतो. घरी आल्यावर कढत पाण्याने अंघोळ करणे, सर्व कपडे गरम पाण्यात धुणे, प्रवासातील सर्व साहित्य उन्हात ठेवणे, ‘त्याला २४ घंटे स्पर्श होणार नाही’, याची काळजी घेणे, त्या साहित्यावर सॅनिटायझर फवारणे, तसेच एका खोलीत रहाणे, घरातील व्यक्तींच्या संपर्कात न येणे इत्यादी जेवढी शक्य आहे, तेवढी दक्षता मी घेत होतो.

मी रहात असलेल्या राज्यात ‘अन्य ठिकाणांहून आलेल्या रहिवाशांनी तपासणीसाठी एका सरकारी रुग्णालयात जायचे आहे’, अशी सरकारी सूचना मी ऐकली. त्याप्रमाणे एक दक्ष नागरिक म्हणून कर्तव्यभावनेने २५.३.२०२० या दिवशी मी त्या सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी गेलो.

२. सरकारी रुग्णालयात आधुनिक वैद्यांनी कोणतीही वैद्यकीय तपासणी न करणे आणि तेथे विलगीकरणाची दक्षता घेतली न जाणे

तेथे मला धक्कादायक अनुभव आला. तेथे अनेक ठिकाणांहून लोक आले होते. त्यामुळे तेथे एकमेकांचा संसर्ग होण्याचीच भीती अधिक होती. मला तपासणीपूर्वी नोंदणीसाठी २० मिनिटे आणि त्यानंतर तपासणीसाठी ३० मिनिटे रांगेत उभे रहावे लागले, म्हणजे विविध ठिकाणांहून आलेल्या या विविध लोकांच्या संपर्कात मी एकूण घंटाभर राहिलो. तेथे विलगीकरणाच्या सूचनाही पाळल्या जात नव्हत्या.

एवढे करूनही त्या सरकारी रुग्णालयात आम्हाला केवळ काही प्रश्‍न विचारून आमच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यांनी आमची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केली नाही. आमच्या शरिराचे तापमानही मोजण्यात आले नाही. त्यांनी आमच्याकडून नोंदणीचे १०० रुपये मात्र आवर्जून घेतले. सॅनिटायझर, तसेच ‘सर्दी, खोकला, ताप येऊ नये’, यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रतिजैविक (अ‍ॅन्टिबायोटिक) किंवा औषध न देता केवळ हातावर शिक्का मारून आम्हाला जायला सांगण्यात आले.

३. रुग्णालयाने रुग्णाचे कोणतेही दायित्व न घेणे

‘कोणतीही वैद्यकीय चाचणी करणार नसतांनाही १ घंटा त्या रुग्णालयातील दूषित वातावरणात राहिल्याने, तसेच विविध ठिकाणांहून आलेल्या लोकांच्या संपर्कात आल्याने मला जर संसर्ग झाला, तर याचे दायित्व कुणाचे ?’, असा विचार माझ्या मनात आला. सरकारी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी सांगितले, ‘‘सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास लगेच रुग्णालयात येऊ नका. अगदी श्‍वास घ्यायला त्रास झाला, तरच या.’’ म्हणजे श्‍वास थांबेपर्यंत रुग्णालय किंवा सरकार दायित्व घेणार नसेल, तर आमचेच १०० रुपये देऊन केवळ हातावर शिक्का मारून घेण्यासाठी त्या दूषित वातावरणात का यायचे ? या सगळ्याला उत्तरदायी कोण ?

४. केवळ नोंदणीचे १०० रुपये घेण्यासाठी आणि हातावर शिक्का मारण्यासाठी दायित्वशून्य यंत्रणेने विविध ठिकाणांहून आलेल्या व्यक्तींच्या दूषित वातावरणात ढकलल्यामुळे साधकाला मनस्ताप होणे

एकीकडे कोरोना गतीने सगळीकडे पसरत असतांना सरकारी यंत्रणा दायित्वशून्यतेने वागत आहेत. वरील माहिती मी त्या सरकारी रुग्णालयामध्ये दूरभाषद्वारेही देऊ शकलो असतो. केवळ नोंदणीचे १०० रुपये घेण्यासाठी आणि हातावर शिक्का मारण्यासाठी या दायित्वशून्य यंत्रणेने मला विविध ठिकाणांहून आलेल्या व्यक्तींच्या दूषित वातावरणात ढकलले अन् मनस्ताप दिला.’

– एक साधक (३०.३.२०२०)

पुणे येथील एका प्रथितयश रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णाला भरती करण्यासाठी गेल्यावर आलेला अनुभव !

कोरोनाबाधित रुग्णाला भरती करण्यासाठी रुग्णालयात नेले, त्या वेळी एका भागातील नगरसेवक आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे आपत्कालीन कक्षामध्ये (कॅज्युलिटी वॉर्डमध्ये) आले. त्यांनी तेथील डॉक्टरांना अनावश्यक प्रश्‍न विचारून हुज्जत घालण्यास आरंभ केला. ‘ज्यांना ऑक्सिजनसहित बेड आवश्यक आहे, त्यांनी रुग्णालयाने ठरवून दिलेली अनामत रक्कम भरावी’, असा तेथील रुग्णालयाचा नियम आहे; मात्र त्या नगरसेवकांनी तेथे विनाकारण गोंधळ घालून ‘मी एक कार्यक्षम नगरसेवक आहे आणि नागरिकांच्या साहाय्यासाठी काम करतो’, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांना अपशब्द वापरून धक्काबुक्कीही केली. या सर्व प्रसंगामध्ये कामावर असलेल्या डॉक्टरांनाही या गोष्टींचा ताण आला. रुग्णांची तपासणी करतांना सुद्धा त्यांचे मन अस्थिर होते. या सर्व प्रकारावरून असे लक्षात येते की, कोणत्या गोष्टीमध्ये लोकेषणा किंवा प्रसिद्धी मिळवावी आणि कोणत्या गोष्टीत करू नये, हेही न समजणारे राजकारणी जनतेला आपत्काळामध्ये काय आणि कसे साहाय्य करणार ? यावर प्रश्‍नचिन्ह उभे रहाते. तसेच महामारीच्या काळातही राजकारण करण्याची एकही संधी हे राजकारणी सोडत नाहीत. यामुळे डॉक्टरांना रुग्णसेवा करण्यासही मर्यादा येतात, असे लक्षात आले.

कोरोनाचा अहवाल त्वरित न दिल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीचे गावात भ्रमण गावातील इतरांना संसर्ग झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? – राजा गावडे, सरपंच, चौके

जिल्हा रुग्णालयाचा दायित्वशून्य कारभार !

मालवण – तालुक्यातील चौके गावातील एका व्यक्तीचा कोरोनाचा तपासणी अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) येऊनही जिल्हा रुग्णालयाकडून या रुग्णाची माहिती ६ दिवसांनी उपलब्ध झाली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊनही हा रुग्ण ६ दिवस उपचाराविना सर्वत्र फिरत असल्याचे उघड झाले. ही गोष्ट अतिशय गंभीर असून जिल्हा रुग्णालयाची दायित्वशून्यता यामुळे उघड झाली, अशी संतप्त प्रतिक्रिया चौके गावचे सरपंच राजा गावडे यांनी व्यक्त केली.

या व्यक्तीची ६ एप्रिलला मालवण ग्रामीण रुग्णालयात केलेल्या ‘रॅपिड टेस्ट’ कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला; मात्र त्याच्या घशातील स्राव तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. १० एप्रिलला त्याचा अहवाल आल्यानुसार त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. १६ एप्रिलला हा अहवाल जिल्हा रुग्णालयाने चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. त्यामुळे चौके गावात खळबळ उडाली. या व्यक्तीमुळे गावात इतरांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्‍न सरपंच गावडे यांनी उपस्थित केला आहे.

स्मशानभूमीतील विदारक वास्तव !

नाशिक – पंचवटी स्मशानभूमीत १६ एप्रिल या दिवशी एकाच वेळी २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते.

लखनऊ – येथील स्मशानभूमीत इतक्या मोठ्या संख्येने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते की, ते दृश्य लांबून पहातांना तेथील अग्नी म्हणजे जसे काही दिव्यांचे ‘लायटिंग’ केल्याप्रमाणे भासत होते.

भोपाळ – येथील स्मशानभूमीतील लाकडे संपल्याने ‘रुग्णांवर अंत्यसंस्कार कसे करावेत’, असा प्रश्‍न स्थानिकांना पडला.

महाराष्ट्रात काही ठिकाणी सरणासाठीची लाकडे संपली. त्यामुळे शेतातील पालापोचाळा घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकी वाईट स्थिती ओढावली आहे.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org