रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपात विदर्भावर अन्याय झाला आहे ! – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
नागपूर – कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपात प्रचंड भेदभाव चालू आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या काही नेत्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पळवला आहे, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी १७ एप्रिल या दिवशी येथे केला. ठाणे येथे प्रति रुग्णामागे २ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे, तर नागपूरमध्ये मात्र २ रुग्णांमागे केवळ एकच इंजेक्शन देण्यात आले आहे, असेही त्यांनी पुराव्यानिशी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपाच्या संदर्भात निश्चित धोरण आखले आहे; मात्र महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते स्वतःच्या जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आरोग्य साहित्य यांचा साठा पळवत आहेत. त्या तुलनेत नागपूर आणि विदर्भात सर्वाधिक आवश्यकता असतांनाही रेमडेसिविर इंजेक्शनचा हवा तसा पुरवठा होत नाही. नागपूरमध्ये कोरोनाची स्थिती अतिशय भयावह असतांना रुग्णांचे नातेवाईक एकेका इंजेक्शनसाठी भटकत आहेत. राज्य सरकारने नागपूर आणि विदर्भावर घोर अन्याय केला आहे.