कराड (जिल्हा सातारा) येथे विनामास्क फिरणार्या ८० जणांवर दंडात्मक कारवाई !
सातारा, १७ एप्रिल (वार्ता.) – सरकारने राज्यात संचारबंदी आदेश दिले असून याला प्रतिसाद न देणार्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी विविध ठिकाणी उभे राहून पोलिसांनी विनाकारण आणि विनामास्क फिरणार्या ८० नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.
शहरातून विनामास्क फिरणार्या ४० जणांवर दंडात्मक कारवाई करत ८ सहस्र २००, तर विनाकारण फिरणार्या ४० जणांकडून ८ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनाकारण आणि विनामास्क शहरात फिरणार्या नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. कोल्हापूर, कार्वे आणि कृष्णा नाक्याकडून येणार्या वाहनांवर ही कारवाई करण्यात येत आहे. तसेच सामाजिक अंतर न पाळणार्या एका दुकानदारावरही कारवाई करण्यात आली असून दुकान ‘सील’ करण्यात आले आहे.
सातारा येथेही मोकाट फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई !
सातारा – पोलिसांनी शिवतीर्थ, राजवाडा, मोती चौक, देवी चौक, श्री काळाराम मंदिर चौक आदी ठिकाणी वाहनचालकांची कडक तपासणी करत दंडात्मक कारवाई केली. राजवाडा परिसरातील हातगाडीधारकांनी विक्रीचा धडाका लावला होता, तर मंगळवार तळे रस्त्यावर भाजीविक्रेत्यांनी ठाण मांडले होते. पोलिसांनी काही भाजीविक्रेत्यांना दंड केला, तर काहीचे साहित्य कह्यात घेतले. काही ठिकाणी पोलिसांनी कडक पवित्रा न घेतल्याने नागरिकांचेही ऐकण्याचे प्रमाण अल्प आहे, असे जाणवत होते.