रेवंडी खाडीपात्रातील अतिक्रमणाच्या विरोधात आश्वासन देऊनही प्रशासनाकडून कारवाई नाही !
ग्रामस्थांमधून प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया
मालवण – तालुक्यातील रेवंडी येथील खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात संतप्त झालेल्या रेवंडी येथील ग्रामस्थांनी खाडीपात्रात उतरून आंदोलन केल्यानंतर या अतिक्रमणावर महसूल प्रशासन, वनविभाग आणि पतनविभाग यांच्या वतीने ८ दिवसांत संयुक्तरित्या कारवाई करू, असे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले होते; परंतु ८ दिवस उलटून गेले, तरी यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
रेवंडी येथील खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून तेथे जांभा दगड आणि माती टाकून मार्ग सिद्ध केला जात आहे. यामुळे खाडीच्या पाण्याचा प्रवाह पालटून त्याचा फटका रेवंडी गावाला बसण्याची भीती आहे. याविषयी ग्रामपंचायतीने विरोध दर्शवत प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शासकीय पंचनामे झाले. कांदळवन आणि येथील बंधारा तोडल्याचे या पंचनाम्याच्या वेळी स्पष्ट झाले. असे असूनही प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी खाडीपात्रात उभे राहून आंदोलन केले होते. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.