कर्नाटकातील मठ आणि मंदिरे यांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देऊ !
कोरोनाला रोखण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची घोषणा
|
बेळगाव (कर्नाटक) – कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे. शहरातील हुक्केरी हिरेमठ येथे जिल्ह्यातील ८० पेक्षा अधिक मठाधिशांनी आयोजित केलेले अग्निहोत्र, धन्वंतरी आणि सुदर्शन होम या कार्यक्रमात ते अलीकडेच सहभागी झाले होते. त्या वेळी त्यांनी हे विचार मांडले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांना मंदिरांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.
हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की,
१. अग्निहोत्र केल्याने कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. त्यासाठी धर्मादाय विभागाच्या माध्यमातून मठ-मंदिरांमध्ये अग्निहोत्र करवून घेण्याची सूचना देण्यात यावी. कोरोनापासून सर्व लोकांना मुक्त करण्यासाठी सर्व मठाधिशांनी आशीर्वाद द्यावेत.
२. नित्य सूर्योदय, तसेच सूर्यास्ताला अग्निहोत्र केल्याने रोगजंतू नाश पावतात, तसेच १ कि.मी. इतक्या अंतरापर्यंत वातावरणाची शुद्धी होते.