राज्यात २-३ दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा सहन करावा लागणार !
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती
मुंबई – काही आस्थापनांकडून ‘रेमडेसिवीर इंजेक्शने’ मिळाली आहेत; मात्र त्यांचे प्रमाण १२ ते १५ सहस्र इतके न्यून आहे. त्यामुळे अजून २-३ दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा सहन करावा लागेल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
या वेळी डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, ‘‘काही आस्थापनांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ३ आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत त्यांनी राज्याला नियमित ५५ सहस्र ‘रेमडेसिवीर’ पुरवण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्यांनी ३७ ते ३९ सहस्र इतकीच ‘रेमडेसिवीर’ पुरवली आहेत. नियमित रुग्णांची संख्या वाढत असतांना ‘रेमडेसिवीर’ची आवश्यकता आहे. १९ किंवा २० एप्रिलनंतर हा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. केंद्रशासनाने ‘रेमडेसिवीर’ निर्यातीवर बंदी घातल्यामुळे महाराष्ट्रातील काही आस्थापनांकडे ‘रेमडेसिवीर’चा साठा उपलब्ध झाला आहे. या आस्थापनांना त्यांचा माल महाराष्ट्रात विकण्यास अनुमती मिळावी, याविषयी केंद्रशासनासमवेत बैठक झाली आहे. या आस्थापनांशी संपर्क साधण्याचे काम शासनाकडून चालू आहे.’’