जीवनाचे ध्येय गाठण्याचा आज सुवर्णदिन आला ।

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘१०.५.२०२० या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी घरातील बागेत फुले काढण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी अनंताच्या झाडावर कधी नव्हे ती ८ फुले उमललेली दिसली. इतर वेळी १ – २ फुलेच असतात किंवा कधी कधी नसतातही. ते पाहून ‘आज गुरूंच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व सृष्टी, लता, वेली आणि फुले आतुर झाली आहेत’, असे मला वाटले. ‘त्यांना गुरुदेवांच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे ते त्यांच्या स्वागताची सिद्धता करत आहेत’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. ‘यावर काही तरी काव्यात्मक व्यक्त करावे’, असे मज मनोदेवता सांगू लागली. त्यामुळे हे कृतज्ञतापुष्प गुरुचरणांवर कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.

श्री. संजय घाटगे

तुझ्या इशार्‍यावर सृष्टीही डोलत आहे ।
जणू ‘तुझ्या सोहळ्याची चाहूल लागली’, असे वदते आहे ॥ १ ॥

सकाळची नित्यकर्मांची वेळ होती ।
घरच्या बागेतील फुले खुडत होतो, तुझ्या पूजेसाठी ॥ २ ॥

अवचित गेले अनंताकडे लक्ष ।
नेहमी हिरमुसलेला असतो हा अनंत ।
आज खुलला होता, फुलला होता ।
जिकडे बघू तिकडे अनंत पसरला होता ॥ ३ ॥

सहज त्याच्याशी बोलणे झाले ।
अरे, आज तुला अकस्मात् काय झाले ।
आज अवचित तुला कसला आनंद झाला ॥ ४ ॥

तो आनंदून म्हणाला, अरे, विसरलास कसा वेड्या ।
आम्हास पुढची गती देणार्‍या
गुरुमाऊलीचा जन्मोत्सव जवळी (टीप १) आला ॥ ५ ॥

त्या अनंताच्या चरणांवर लोळण घेण्यासाठी ।
माझाही जीव आता आतुरला ॥ ६ ॥

जीवनाचे ध्येय गाठण्याचा आज सुवर्णदिन आला ।
त्यांच्या चरणांवर समर्पित होण्याचा समय आला ॥ ७ ॥

तोच श्रीकृष्ण कलियुगी ‘श्रीकृष्णावतार’ म्हणून आला ।
ही आठ फुलेही अष्टांग साधनेची पूर्तता करण्या ।
शरणागतीने लीन होती चरणी गुरुमाऊलीच्या ॥ ८ ॥

टीप १ : १३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव होता.’

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, कोल्हापूर.

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक