साधकांना सेवेच्या माध्यमातून परिपूर्णतेकडे नेणारे आणि प्रत्येक साधकाची साधना चांगली व्हावी, यासाठी तळमळीने प्रयत्न करवून घेणारे सद्गुरु सत्यवान कदम !
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (१३.४.२०२१) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त कुडाळ सेवाकेेंद्रातील श्री. सुरेंद्र चाळके यांनी त्यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. लाकडे दुसर्या ठिकाणी ठेवत असतांना सद्गुरु सत्यवानदादांनी साहाय्य करणे
‘मी एकदा सेवाकेंद्रात स्वच्छता करत असतांना आगाशीवरती लाकडे (प्लायवूड) होती. ती दुसर्या ठिकाणी ठेवत असतांना सद्गुरु सत्यवानदादा माझ्या साहाय्याला आले. ‘आपण दोघांनी उचलूया’, असे म्हणून ते मला साहाय्य करू लागले. ते मला म्हणाले, ‘‘तुला एकट्याला थकायला होईल.’’
२. ‘प्रत्येक ठिकाणी सेवा परिपूर्ण झाली पाहिजे आणि त्यातून साधकांची साधना चांगली झाली पाहिजे’, अशी तळमळ असणे
‘प्रत्येक ठिकाणी सेवा परिपूर्ण झाली पाहिजे आणि त्यातून साधकांची साधना चांगली झाली पाहिजे’, अशी त्यांची तळमळ असते. स्वयंपाकघरामध्ये जेवण अधिक होत असे. त्यामुळे ते प्रतिदिन स्वयंपाकघरातील साधिकांसमवेत बसून नियोजन करून द्यायचे. तसेच स्वच्छतेच्या नियोजनाचे बारकावेही सांगून स्वच्छता परिपूर्ण होते ना, याकडे लक्ष देऊन करवून घ्यायचे. आमची नामजपाची घडी बसवण्यासाठी ते ध्यानाच्या वेळी ध्यानमंदिरात येऊन बसायचे. आम्हा सर्व साधकांना ‘या वेळेमध्ये नामजपाला बसूया’, असे सांगून स्वतः अगोदर येऊन बसायचे. ‘त्या वेळी ते प्रत्येक कृती करून दाखवत असत’, हे लक्षात आले.
३. कुडाळ सेवाकेंद्राची घडी बसवण्यासाठी सद्गुरु दादांची पुष्कळ तळमळ असणे आणि प्रत्येक साधकांच्या प्रगतीकडे त्यांचे लक्ष असणे
कुडाळ सेवाकेंद्राची घडी बसवण्यासाठी सद्गुरु दादांची पुष्कळ तळमळ असते. ते प्रत्येक सेवेची कार्यपद्धत घालण्याकडे लक्ष देतात आणि ती कार्यपद्धत पूर्ण होत आहे ना, याचा पाठपुरावा घेतात. त्यातील लहान लहान चुका सांगून ‘आमची साधना कशी होईल ?’, ते दाखवतात. मी साधनेत पुढे जाण्यासाठी माझ्याकडून होत असलेल्या चुकांची सद्गुरु दादा वेळोवेळी जाणीव करून देतात. प्रसंग कितीही संघर्षमय असला, तरी ते आई मुलाला चुका सांगून परत त्याच्यावरती प्रेम करते, तसेच सद्गुरु दादा मला चुका दाखवून साधनेत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. ‘त्या वेळी सद्गुरु दादा प्रत्येक साधकांच्या प्रगतीकडेच लक्ष देतात’, हे लक्षात आले.
४. ‘सद्गुरु दादांचे कार्य अस्तित्व आणि संकल्प या दोन गोष्टींवर चाललेले असते’, असे मनात येणे
‘सद्गुरु दादांचे कार्य अस्तित्व आणि संकल्प या दोन गोष्टींवर चाललेले असते’, असे अनेक वेळा मनात येते. सद्गुरुदादा शांत आणि पुष्कळ नम्र आहेत. त्यांच्यामध्ये अहं अत्यल्प असून त्यांची श्री गुरूंवर प्रचंड श्रद्धा आहे. ‘प्रत्येक कृती श्री गुरुदेव करत आहेत’, अशी त्यांची श्रद्धा असते. सेवाकेंद्रात एखादा पालट करायचा विचार त्यांच्या मनात आल्यावर त्या संदर्भात पटकन निर्णय मिळून ती सेवा पूर्ण होत असे. सेवाकेंद्राचे दरवाजे खराब झाले होते. लाद्या खराब झाल्या होत्या. त्यांच्या मनात आल्यावर पटकन साधक सेवेला येऊन ती सेवा पूर्ण होत असे. तसेच वाळू, सिमेंट, लाद्या या अर्पणातून सहज उपलब्ध होत असत. ‘त्या वेळी सद्गुरु दादांच्या मनात आल्यावर ती सेवा पूर्ण होत आहे’, असे जाणवले.
५. सद्गुरु दादा पितृपंधरवड्यात पान ठेवण्यासाठी गेल्यावर सर्व पितर वाट पहात असणे
एकदा पितृपंधरवडा होता. त्या वेळी सद्गुरु दादा पितरांसाठी पान ठेवत असत. त्यांनी प्रार्थना करून पान ठेवल्यावर थोड्या वेळाने पहायला गेल्यावर तिथे अन्नाचा कणही नसतो. दुसर्या दिवशी ते पान ठेवण्यासाठी गेल्यावर ‘सर्व पितर वाटच पहात आहेत’, हे लक्षात आले. तिथे आजूबाजूला कावळे येऊन बसत असत. सद्गुरु दादा तिथे पान ठेवून खाली आल्यावर पानामध्ये असणारे अन्न कावळा येऊन खाऊन जात असे. त्या वेळी ‘सर्वांचे पितर तिथे येत आहेत’, हे लक्षात आले. ‘सद्गुरूंच्या हस्ते त्यांना पुढची गती मिळाली’, हे त्यातून लक्षात आले.
६. सद्गुरु दादांमुळे चैतन्यमय झालेल्या वातावरणाचा लाभ पक्षीही घेत असल्याचे लक्षात येणे
सद्गुरु दादा सेवाकेंद्रातील आगाशीवर नामजपाला बसल्यावर त्यांच्याभोवती चिमण्या, फुलपाखरे, तितर पक्षीसुद्धा येत असत. ‘त्या वेळी सद्गुरु दादांमुळे चैतन्यमय झालेल्या वातावरणामध्ये ते पक्षी खेचले जात आहेत’, हे लक्षात आले.
७. सद्गुरु दादांच्या खोलीत गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे
सद्गुरु दादांच्या खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवते. त्यांच्या खोलीत गेल्यावर चंदनाचा सुगंध येतो. त्यांच्या खोलीतील लाद्या गुळगुळीत झाल्या आहेत. खोलीत गेल्यावर नामजप आपोआप चालू होतो. सद्गुरु दादांच्या पायावर ओम उमटले आहेत.
८. ‘सद्गुरु दादा ध्यानाला बसल्यावर सूक्ष्मातूनच सर्व कार्य होत आहे’, असे वाटणे आणि ‘त्यांच्या ध्यानामध्ये किती शक्ती आहे’, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे
‘सद्गुरु दादा ध्यानाला बसल्यावर सूक्ष्मातून सर्व कार्य होत आहे’, असे बर्याच वेळा जाणवते. त्या वेळी मनामध्ये ‘सद्गुरु दादा सूक्ष्मातूनच साधकांसाठी उपाय करत आहेत’, असे लक्षात येते. सद्गुरु दादा ध्यानाला बसल्यावर त्यांच्याकडे बघत राहिलो, तरी नामजप आपोआप चालू होतो. एकदा सद्गुरु दादा आढावा घेत असतांना भाववृद्धीसाठी प्रयोग चालू असतांना त्यांचे ध्यान लागले होते. त्या वेळी आम्ही सर्व साधक त्यांच्याकडे पहात होतो. त्या वेळी आम्हा सर्व साधकांना आध्यात्मिक लाभ होत होता. त्या पाच मिनिटांमध्ये आमच्या शरिरावरील त्रासदायक आवरणसुद्धा निघून गेले. त्या वेळी सद्गुरु दादांनी ध्यान लावण्याचे महत्त्व आम्हाला कळले. त्या वेळी ‘त्यांच्या ध्यानामध्ये किती शक्ती आहे’, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’
– श्री. सुरेंद्र चाळके, कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग.
(५.४.२०२१)
|