अमली पदार्थांची तस्करी आणि तटरक्षक दलाचे यश !
भारतीय तटरक्षक दलाने अलीकडे लक्षद्वीप बेटाजवळ असलेल्या मिनिकॉय बेटाजवळ श्रीलंकेच्या ३ मासेमारी बोटी पकडल्या. त्यामधून ४ सहस्र ९०० कोटी रुपयांचे १ सहस्र ६०० किलो एवढे अमली पदार्थ पकडण्यात आले. तसेच ५ एके ४७ बंदुका आणि १ सहस्र जिवंत काडतुसे पकडण्यात आली. लक्षद्वीप आणि मिनिकॉय ही बेटे अरबी समुद्रात आहेत. तेथून जवळच २५० किलोमीटर अंतरावर श्रीलंका असून खालच्या बाजूने मालदीव हा देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तटरक्षक दलाच्या सैनिकांनी हेलिकॉप्टर्सद्वारे त्या बोटींवर घिरट्या घातल्या आणि नेमक्या बोटी शोधून काढल्या. समुद्रात ३ बोटींचा शोध घेणे सोपे काम नसते. त्यामुळे त्यांच्याकडून ही चांगली मोहीम राबवण्यात आली. या वेळी १९ खलाशांनाही कह्यात घेण्यात आले. चीन किंवा पाकिस्तान हे इतर देशांच्या साहाय्याने भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रे पाठवणार होते; परंतु या बोटी किनारपट्टीवर पोचण्यापूर्वीच पकडण्यात आल्या. त्यामुळे एक मोठा घातपात टळला. यासाठी तटरक्षक दल, गुप्तचर यंत्रणा आणि या मोहिमेत सहभागी झालेल्या सुरक्षारक्षकांचे कौतुक करायला पाहिजे.
सर्व प्रकारच्या सुरक्षादलांनी सतर्क राहिल्यास किनारपट्टीवरील धोका टाळण्यात यश मिळेल !
२६/११ चे आक्रमण हे समुद्राच्या मार्गाने मुंबईवर झाले होते. वर्ष १९९३ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते. त्या वेळी रायगडच्या किनारपट्टीवर तस्करीच्या मार्गाने बोटी आणण्यात आल्या होेत्या. भारताला ७ सहस्र ६०० किलोमीटरचा, तर महाराष्ट्राला ७८० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथून मोठ्या प्रमाणात तस्करी आणि अवैध व्यापार होत असतो. अशा प्रकारची शस्त्रे, अमली पदार्थ किंवा अन्य गोष्टी या बहुतेक वेळा पाकिस्तानमधून आणि काही वेळा श्रीलंकेच्या बाजूने येतात. अनेकदा श्रीलंकेच्या बाजूने केरळ आणि तमिळनाडू या राज्यांच्या किनारपट्टीवर आतंकवादी उतरले आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय किनारपट्टीवर प्रतिदिन अनुमाने २ ते अडीच लक्ष मच्छिमार बोटी समुद्रात मासेमारी करत असतात. त्यात एखादी दुष्कृत्य करणारी बोट पकडणे सोपे काम नसते. गुप्तचर यंत्रणेकडून चांगली माहिती मिळाली, तर सुरक्षादल त्यांना निश्चित पकडू शकते. चीन आणि पाकिस्तान येथून अशा प्रकारचे धोके होतच रहाणार आहेत. सध्या मुंबईच्या पोलीसदलाचे लक्ष हे वाझे प्रकरणाकडे लागले आहे. या परिस्थितीचा अपलाभ घेऊन चीन आणि पाकिस्तान येथून दुष्कृत्ये करणारे लोक भारतीय किनारपट्टीवर येऊ शकतात. त्यामुळे नौदल, तटरक्षक दल, सागरी पोलीस, सीआयएस्एफ् आदी सर्व प्रकारच्या सुरक्षा दलांनी सदैव सतर्क रहाणे आवश्यक आहे. मला निश्चिती आहे की, सर्व जण डोळ्यांत तेल घालून काळजी घेतील आणि कर्तव्य पार पाडतील. सर्वांनी एकत्रित राहून काम केले, तर किनारपट्टीवर असलेला धोका टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच यश मिळू शकते.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे