फ्रान्सचा ‘इस्लामी’ संघर्ष !
संपूर्ण विश्वात सध्या कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण आहे. कोरोना अल्प म्हणून कि काय, अनेक देशांवर आज युद्धसंकटही तितकेच घोंगावत आहे. सर्वत्रचे वाढते अराजक ही तिसर्या महायुद्धाची जणू नांदीच म्हणावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्स या देशाने तर दूतावासाच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये रहाणार्या त्याच्या नागरिकांना मायदेशी परतण्याचा आदेश दिला आहे. ‘पाकिस्तानमध्ये रहाणे सध्या अतिशय धोकादायक आहे. तेथील परिस्थिती फ्रान्सच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे फ्रान्सचा कोणताही नागरिक पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत असेल, तर त्याने तातडीने देश सोडावा’, असे आवाहन करण्यात आले आहे. यामागील पार्श्वभूमी म्हणजे ‘प्रेषित महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यावरून फ्रान्सच्या राजदूताची हकालपट्टी करावी आणि फ्रान्ससमवेत असणारे संबंध तोडावेत’, या मागणीसाठी तहरीक-ए-लब्बैक या कट्टरतावादी संघटनेच्या वतीने हिंसक आंदोलन चालू केले. खरेतर या संघटनेवर १४ एप्रिल या दिवशी आतंकवादविरोधी कायद्यानुसार बंदीही घालण्यात आली आहे; मात्र तरीही अटकेत असणार्या त्या संघटनेचा प्रमुख साद रिझवी याच्या सुटकेसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये फ्रान्सच्या विरोधात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्सच्या दृष्टीने ही काही पहिलीच घटना नव्हे. याआधीही फ्रान्सने मुसलमानबहुल देशात रहाणार्या त्याच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले होते. वर्ष २०२० मध्ये इतिहासाचे शिक्षक सॅम्युएल पॅटी यांनी विद्यार्थ्यांना शार्ली हेब्दोमध्ये प्रसिद्ध झालेली महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रे दाखवत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय समजावून सांगितला होता. त्यामुळे एका विद्यार्थ्याने त्यांचा शिरच्छेद केला होता. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅटी यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्राध्यक्षांच्या या कृतीमुळे अनेक मुसलमानबहुल देश आणि अरब देश संतापले होते. त्यांनी फ्रान्सच्या मालावर बहिष्कार टाकला होता. सौदी अरेबियात तर ‘कॅर्रेफोर’ या फ्रेंच सुपरमार्केट साखळीवरही बहिष्कार घालण्यात आला. अनेक देशांनी मॅक्रॉन यांची पोस्टर जाळली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती. वर्ष २०१५ मध्ये ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर झालेले आक्रमण, पॅरिसमध्ये झालेली भयावह आतंकवादी आक्रमणे, ८६ जणांची हत्या करणारे नाईस शहरातील आक्रमण अशा अनेक घटना पहाता गेल्या काही वर्षांपासून फ्रान्स हा देश जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य ठरत आहे, हे प्रकर्षाने लक्षात येते. अमेरिका आणि भारत यांच्यानंतर आतंकवादाची झळ बसलेला फ्रान्स तिसरा मोठा लोकशाहीवादी देश आहे. अर्थात् या सगळ्यातून डगमगून न जाता इस्लामी आतंकवादाच्या विरोधात फ्रान्स तेवढ्याच शक्तीने उभा राहिला, हे विशेष
कायदेशीर अभिव्यक्ती स्वातंत्र्य !
फ्रान्सला भेडसावणार्या या स्थितीमागील कारणमीमांसा जाणण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते, ते म्हणजे ईश्वरनिंदा करण्याचा अधिकार फ्रान्समध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेतच येतो. ईश्वरनिंदेला तेथे एकप्रकारे कायदेशीर अधिष्ठानच आहे; पण इस्लामी देशांच्या दृष्टीने म्हटले, तर ईश्वरनिंदा असो किंवा प्रेषित महंमद पैगंबर यांच्यावरील टीका असो, तो तेथे गंभीर गुन्हा मानला जातो. दोन्ही देशांतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मापदंड वेगवेगळे असल्याने भावना दुखावल्या जाणे अथवा न जाणे हे त्यावर अवलंबून असते. खरे पहाता धर्माच्या नावाखाली होणारी टिंगलटवाळी भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशासह अन्य देशांमध्ये निषिद्धच मानली जाते; पण फ्रान्सची स्थिती वेगळी आहे. अभिव्यक्तीप्रमाणेच ईश्वरनिंदा करणार्याचीही तेथे जपणूक केली जाते. अर्थात् तेथील मूल्ये, कायदे यांना न जुमानता जिहादी विचारसरणी पसरवणारे इस्लामी देश धर्मयुद्धाच्या नावाखाली हिंसाचार घडवत आहेत. फ्रान्समध्ये बहुतांश धर्मांध हे शरणार्थी किंवा धर्मांतरित आहेत. तेथील विविध मशिदींमधून धर्मांतराचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. अशा या कट्टरतावादी समूहाला फ्रान्समधील कायदे मान्य नाहीत. ‘फ्रान्समध्ये रहायचे असेल, तर तेथील कायद्यांचे पालन करावे लागेल’, असे तेथील सरकारचे म्हणणे आहे, जे करण्यास धर्मांध सिद्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये ‘इस्लाम खतरे में’ अशी आवई इस्लामी जगात उठवली जात आहे. त्यामुळे फ्रान्सवर आतंकवादी आक्रमणे करून आघात करण्याचे षड्यंत्र आतंकवादी संघटना आणि धर्मांध यांच्याकडून रचले जात आहे. फ्रान्सने याविरोधात दंड थोपटले आहेत.
फ्रान्सकडून शिका !
फ्रान्सच्या संदर्भात विचार करायचा म्हटल्यास तेथील राष्ट्राध्यक्षांवर जेव्हा तुर्कस्तानने टीका केली, तेव्हा फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने ‘तुर्कस्तानसमवेतचे राजकीय संबंध संपुष्टात आणायचे कि फ्रान्सच्या राजदूतांना कायमस्वरूपी माघारी बोलवायचे, यावर निर्णय घेण्यात यावा’, असे म्हटले होते. याप्रमाणे आताही फ्रान्सने स्वदेशप्रेम जोपासत पाकमध्ये वास्तव्यास असल्याने संकटात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी बोलावून कणखरपणाच दाखवला आहे. भारतानेही तो शिकायला हवा. फ्रान्स राष्ट्रहितासाठी जगाची पर्वा करत नाही. आतंकवादाशी स्वतः लढून तो स्वतःची शक्ती दाखवतो. कट्टरतावादी इस्लामी आतंकवादी विचारसरणीला आळा घालण्यासाठी मॅक्रॉन यांनी वर्ष २०२० मध्ये फ्रान्समधील मुसलमान नेत्यांना ‘चार्टर ऑफ रिपब्लिकन वैल्यूज’ या घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ‘इस्लाम एक धर्म असून त्याला कोणत्याही प्रकारच्या राजकीय आंदोलनाला जोडले जाऊ शकत नाही. फ्रान्सच्या मुसलमान संघटनांच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचे विदेशी हस्तक्षेप सहन केले जाणार नाहीत, तसेच फ्रान्समधील इमामांना फ्रेंच भाषा येणे अनिवार्य असेल, तसेच त्यांना शैक्षणिक पदव्या घेणेसुद्धा बंधनकारक असणार आहे’, असे घोषित करण्यात आले होते. फ्रान्स हा तसा छोटासा देश. असे असूनही तो स्वतःची मूल्ये जोपासण्यासाठी इस्लामी राष्ट्रांच्या विरोधात ताठ मानेने उभा रहातो. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. भारताने यातून शिकण्यासारखे आहे. आतंकवादी, धर्मांध आणि जिहादी संघटना यांना ताळ्यावर आणण्यासाठी फ्रान्सने जशी कठोर पावले उचलली, तशी भारताने उचलणे आवश्यक आहे. अशानेच भारतातील आतंकवाद संपेल.