राज्यातील व्यापारी कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करून दोन दिवसांत महाराष्ट्र चेंबर त्यांचा निर्णय घोषित करणार ! – ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर

सांगली, १६ एप्रिल – महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली दळणवळण बंदी ही १०० टक्के नाही. त्यामुळे कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करून २ दिवसांत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय सर्वानुमते महाराष्ट्र चेंबरच्या वतीने आयोजित सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर’च्या वतीने सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांची ‘झूम व्हिडिओ कॉन्फरन्स’वर बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत २०० हून अधिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या संदर्भात ललित गांधी म्हणाले, ‘‘संपूर्ण दळणवळण बंदी घोषित केल्यास त्यात व्यापारी सहभागी होतील, असे सरकारला कळवूनही सरकारने कोणताच ठाम निर्णय घेतला नाही.’’ महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. अतुल शहा म्हणाले, ‘‘राज्य सरकारचा हा आदेश सर्वांना समान न्याय देणारा नसून मूळ कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी योग्य नाही. या आदेशानुसार आपल्यावर अन्याय होत असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी.’’