कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटर उभारणार
कणकवली – कणकवली शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या रुग्णांना योग्य उपचारांसाठी जागा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने कणकवली नगरपंचायतीच्या वतीने ‘कोविड केअर सेंटर’ चालू करण्यात येईल, अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. जिल्ह्यात नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणारे हे पहिले कोविड केअर सेंटर असणार आहे.
या कोविड केअर सेंटरला मान्यता मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. या सेंटरला मान्यता दिल्यावर ते शहरातील रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले. कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन सुविधा केंद्राजवळ या सेंटरसाठी भूमी निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी २५ खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या फार्मसी कॉलेजची कोविड केअर सेंटरसाठी पहाणी
कणकवली तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यातील रुग्णांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांच्या शिरवल येथील ‘विजयराव नाईक फार्मसी कॉलेज’ची १५ एप्रिलला जिल्हाधिकार्यांनी पहाणी केली. येथे ५० खाटांची सोय होणार आहे. तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील कोविड केअर सेंटरमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने पर्यायी जागांचा विचार केला जात आहे.