कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे गोवा राज्यात हाहाःकार !

गोव्यात आजपर्यंतचे दिवसभरातील सर्वाधिक ७५७ कोरोनाबाधित, तर ५ मृत्यू

पणजी – गोवा राज्याला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने झोडपून काढले आहे. १५ एप्रिलला दिवसभरात करण्यात आलेल्या २ सहस्र ७११ कोरोनाविषयक चाचण्यांमध्ये ७५७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. हे प्रमाण २७.९२ टक्के आहे. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्‍या कोरोनाबाधितांची संख्या आता ५ सहस्र ६८२ झाली आहे. कोरोना केंद्रावर मोठ्या संख्येने कोरोनाबाधित पुढीलप्रमाणे आहेत. मडगाव सर्वाधिक ६६० रुग्ण, त्याखालोखाल पर्वरी ५५८, म्हापसा ४०१, पणजी ३९८, फोंडा ३८०, कांदोळी ३२१ आणि कुठ्ठाळी २८४ अशी संख्या आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ८६२ झाली आहे. दिवसभरातील ५ मृतांपैकी मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात २ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात अतीदक्षता विभाग चालू करणार

मडगाव – मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात अतीदक्षता विभाग चालू करण्याविषयी आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी १५ एप्रिलला केले. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन या ठिकाणी अतीदक्षता विभाग आणि तीव्र उपचार केंद्र (आयसीयू आणि आयटीयू) चालू करून खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ई.एस्.आय. रुग्णालयातही आयसीयू आणि आयटीयू चालू करण्यात येणार आहे.